रशिया व चीनच्या नौदलाची ‘सी ऑफ जपान’मध्ये संयुक्त गस्त

मॉस्को/बीजिंग – सोमवारी रशिया व चीनच्या नौदलाने ‘सी ऑफ जपान’चा भाग असलेल्या सागरी क्षेत्रात संयुक्त गस्त घातल्याची माहिती समोर आली आहे. ‘सी ऑफ जपान’च्या मार्गे रशिया व चीनच्या युद्धनौकांनी पॅसिफिक महासागरात प्रवेश केल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही देशांनी ‘सी ऑफ जपान’मध्ये गस्त घालण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. चीन व रशियाचे हे सहकार्य भविष्यात अमेरिकापुरस्कृत आघाडीला आव्हान देईल, असे चिनी माध्यमांनी बजावले आहे.

संयुक्त गस्त

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून, रशियाच्या पूर्वेकडील सागरी क्षेत्रात ‘रशिया-चीन जॉईंट सी २०२१’ हा नौदल सराव आयोजित करण्यात आला होता. हा संयुक्त सराव झाल्यानंतर सोमवारी दोन्ही देशांच्या १० युद्धनौकांनी ‘सी ऑफ जपान’मध्ये प्रवेश केला. जपानची मुख्य भूमी व त्याच्या उत्तरेकडे असणार्‍या होक्कायडो या बेटादरम्यान असलेल्या ‘त्सुगारु स्ट्रेट’मधून रशिया व चीनच्या युद्धनौकांनी गस्त घातली. या सागरी क्षेत्रातून दोन्ही देशांच्या युद्धनौकांनी पॅसिफिक महासागरात प्रवेश केल्याचे जपानकडून सांगण्यात आले. जपान दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले.

चीन व रशियाची ही संयुक्त गस्त अमेरिकापुरस्कृत आघाडीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे चीनच्या माध्यमांकडून बजावण्यात आले आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने चीन व रशियामधील हे वाढते सहकार्य अमेरिकेकडून राबविण्यात येणार्‍या ‘ऑकस डील’सारख्या योजनांना आव्हान देईल, असा इशाराही चिनी दैनिकाने दिला आहे. गेल्या वर्षभरात रशिया तसेच चीनच्या नौदलाने स्वतंत्ररित्या अमेरिकी हद्दीनजिक प्रवास केल्याचा हवालाही ‘ग्लोबल टाईम्स’कडून यावेळी देण्यात आला.

संयुक्त गस्त

चीनच्या वाढत्या विस्तारवादी कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने गेल्या काही वर्षांपासून ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात संरक्षणतैनाती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतानाच त्यात इतर मित्र तसेच भागीदार देशांनाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या या ‘इंडो-पॅसिफिक’ आघाडीत ऑस्ट्रेलिया, भारत, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा यासारखे देश सहभागी झाले आहेत. या देशांनी आपल्या युद्धनौका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात पाठविल्या असून संयुक्त नौदल सरावही पार पडले आहेत.

अमेरिकेची ही आघाडी चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी मोठा अडथळा ठरला आहे. चीनची राजवट सातत्याने या आघाडीतील देशांवर विविध मार्गांनी दडपण आणण्याचे व धमकावण्याचे प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला रशियासारख्या मित्रदेशाबरोबरील संरक्षण सहकार्य अधिक वाढविण्यासाठीही चीनकडून पावले उचलण्यात येत आहेत. सोमवारी ‘सी ऑफ जपान’मध्ये घातलेली गस्त त्यातीलच महत्त्वाचा टप्पा ठरतो. चीनच्या माध्यमांकडून करण्यात आलेली वक्तव्येही त्याला दुजोरा देणारी आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info