वॉशिंग्टन – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या वाढत्या फैलावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास मंदावण्याचा धोका आहे, असा इशारा अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी दिला. नव्या व्हेरिअंटमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठा साखळीतील समस्या अधिक गंभीर होऊ शकते, तसेच मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे असे येलेन यांनी यावेळी बजावले. त्याचवेळी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने ओमिक्रॉन अमेरिकेत महागाईचा भडका उडवू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या संसर्गाची व्याप्ती वेगाने वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या ओमिक्रॉनचा जवळपास ४० देशांमध्ये फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. युरोप खंडात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक देशांमध्ये साथीच्या काळातील विक्रमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. युरोपपाठोपाठ अमेरिका तसेच आशियातही रुग्णांची संख्या हळुहळू वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी ओमिक्रॉन व्हेरिअंट जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ‘ओमिक्रॉनमुळे मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या समस्या अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा महागाई वाढेल तसेच ग्राहकांमध्ये असणारी मागणीही घटण्याची शक्यता आहे. हे घटक अर्थव्यवस्थेचा विकास मंदावणारे ठरतील’, असे येलेन यांनी बजावले.
तर अमेरिकेतील ‘फेडरल रिझर्व्ह’च्या वरिष्ठ अधिकार्यांनी ओमिक्रॉन देशात महागाईचा भडका उडवू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ‘ओमिक्रॉन कोरोनाच्या आधीच्या प्रकारांच्या तुलनेत अधिक घातक असल्याचे आढळले तर अमेरिकेत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. नवा व्हेरिअंट पुरवठा साखळीवर अधिक दडपण आणूू शकतो तसेच मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा अधिक गंभीर होऊ शकतो’, अशी चिंता फेडरल रिझर्व्हच्या क्लीव्हलॅण्ड क्षेत्राच्या प्रमुख लॉरेटा मेस्टर यांनी वर्तविली आहे.
अमेरिकेच्या अर्थमंत्री व फेडरल रिझर्व्हपाठोपाठ ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट’(ओईसीडी) या गटानेही ओमिक्रॉनमुळे जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित होऊ शकते, याकडे लक्ष वेधले आहे. ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या स्थितीत नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे अधिकच भर पडली आहे. जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रियेला हा व्हेरिअंट मोठा धोका ठरु शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक वाईट होण्याचीही भीती आहे’, असा इशारा ‘ओईसीडी’च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ लॉरेन्स बून यांनी दिला.
दरम्यान, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) ओमिक्रॉनवरून अलर्ट दिला असून या व्हेरिअंटचा फैलाव दरदिवशी वाढत असल्याचे बजावले आहे. आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या खूप जास्त असू शकते, अशी भीतीही ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकार्यांनी व्यक्त केली. नवा व्हेरिअंट अधिक संसर्गजन्य असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |