इराणला अण्वस्त्रे मिळू न देण्यासाठी इस्रायलची मोसाद काहीही करील

- मोसादच्या प्रमुखांचा इशारा

जेरूसलेम/व्हिएन्ना – ‘इस्रायल इराणला कधीही अण्वस्त्रांनी सज्ज होऊ देणार नाही. इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीचा धोका कमी करण्यासाठी इस्रायल काहीही करायला तयार आहे’, असे इस्रायलची ख्यातनाम गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी बजावले. जागतिक शक्ती आणि इराण यांच्यातील वाईट अणुकरार इस्रायल खपवून घेणार नाही, असे सांगून मोसादच्या प्रमुखांनी व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या अमेरिका व इराणमधील वाटाघाटींना लक्ष्य केले.

मोसाद

गेल्या सोमवारपासून व्हिएन्ना येथे अमेरिका, युरोपिय देश आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिका व युरोपिय देशांनी या वाटाघाटी त्वरीत थांबवाव्या, अशी मागणी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केली. या वाटाघाटींद्वारे इराण अमेरिका व युरोपिय देशांना ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करीत असल्याचा आरोप पंतप्रधान बेनेट यांनी केला होता. इस्रायली पंतप्रधानांच्या या इशार्‍याला काही तास उलटत नाही तोच, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी इराणसह अमेरिकेला खडसावले. आपला अणुकार्यक्रम अण्वस्त्रनिर्मितीसाठी नाही तर नागरी वापरासाठी असल्याचा दावा इराण करीत आहे.

पण नागरी वापरासाठी ६० टक्के युरेनियम संवर्धित करण्याची आवश्यकता नसल्याचे बार्नी यांनी मोसादच्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले. ‘नागरी वापरासाठी तीन संवर्धित प्रकल्प, हजारो सक्रीय सेंट्रिफ्यूजेसची आवश्यकताच नाही. अणुबॉम्बची निर्मिती करण्याचा हेतू असेल, तर इतक्या प्रमाणात आण्विक साहित्यांची गरज असते’, असे सांगून बार्नी यांनी इराणचा अणुकार्यक्रम लष्करी असल्याचा आरोप केला.

‘इराण आखातात वर्चस्व मिळविण्याची तयारी करीत आहे. या क्षेत्रात दहशतवादाला खतपाणी घालत असून हा दहशतवाद रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. इराणचा हा दहशतवाद आखातातील स्थैर्याला धोका ठरत आहे. त्यामुळे कुठलाही वाईट अणुकरार इस्रायल अजिबात खपवून घेणार नाही’, असे मोसादच्या प्रमुखांनी बजावले. इस्रायलची नजर इराणवर रोखलेली असून इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज होऊ नये, यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे बार्नी मोसादच्या एका कार्यक्रमात म्हणाले.

मोसादचे प्रमुख इराणबाबत इशारा देत असताना, इस्रायली गुप्तचर संस्थेने इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात केलेल्या कारवाईबाबत काही नवी माहिती समोर आली आहे. जुलै २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत मोसादने इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात चार हल्ले चढविले. यासाठी १८ महिन्यांची पूर्वतयारी करावी लागली. यात सुमारे एक हजार एजंट्स, हेर आणि संबंधित तंत्रज्ञ सहभागी झाली होती. तर मोसादने ही मोहीम पार पाडण्यासाठी इराणच्या १० अणुशास्त्रज्ञांशी संपर्क साधल्याची माहिती इस्रायली वृत्तसंस्थेने दिली. मोसाद किंवा इस्रायली अधिकार्‍यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण नातांझ अणुप्रकल्पांमधील संशयास्पद स्फोटामुळे इराणचा अणुकार्यक्रम काही महिन्यांसाठी मागे पडल्याचा दावा केला जातो.

इस्रायलने इराणविरोधात गोपनीय मोहीम राबवू नये – अमेरिकेची इस्रायलकडे मागणी

तेल अविव – व्हिएन्ना येथे अणुकरारावर चर्चा सुरू असताना इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाविरोधात छुपी मोहीम राबवू नये, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. इस्रायलच्या कुठल्याही छुप्या कारवाईला अमेरिकेचा विरोध असेल, असा संदेश बायडेन प्रशासनाने इस्रायली सुरक्षा यंत्रणेला दिल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. पुढच्या आठवड्यात इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि मोसादचे प्रमुख बार्नी अमेरिकेचा दौरा करणार आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून व्हिएन्ना येथे सुरू असलेली चर्चा कुठल्याही निर्णयाशिवाय स्थगित झाली आहे. सोमवारपासून ही चर्चा नव्याने सुरू होणार असून इराणच्या भूमिकेबाबत अमेरिका समाधानी नसल्याच्या बातम्या येत आहेत. असे असले तरी वाटाघाटी सुरू ठेवणार असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर इस्रायल व अरब मित्रदेश अधिकच नाराज झाले आहेत.

 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info