तैवानमुळे अमेरिकेला जबर किंमत मोजावी लागेल

- चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांचा इशारा

बीजिंग/वॉशिंग्टन/तैपेई – तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकेला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकतीच अमेरिकेच्या संरक्षणखर्चाचा भाग असणाऱ्या ‘डिफेन्स ॲक्ट`वर स्वाक्षरी केली आहे. त्यात तैवानच्या सुरक्षेची हमी देण्यात आली असून तैवानला ‘रिमपॅक` या युद्धसरावात सहभागी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे परराष्ट्रमंत्री यी यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

किंमत मोजावी लागेल, वँग यी

गेल्या काही महिन्यात चीन तैवानच्या मुद्यावरून अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील`, असे जिनपिंग यांनी बजावले होते. हा इशारा देत असतानाच चीनने तैवाननजिकच्या क्षेत्रातील संरक्षणदलांच्या हालचालींनाही वेग दिला आहे.

जून महिन्यापासून ‘साऊथ चायना सी`मध्ये सातत्याने युद्धसराव सुरू असून यात तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम असणाऱ्या सरावांचाही समावेश आहे. दुसऱ्या बाजूला चीनच्या मच्छिमारी जहाजांचा व बोटींचा समावेश असणारा ‘नेव्हल मिलिशिआ` तैवानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी करीत असल्याचे समोर आले आहे. चीनची लढाऊ विमाने व युद्धनौकाही तैवानच्या क्षेत्रात धडका देत आहे. चीनच्या आक्रमक हालचाली वाढत असतानाच अमेरिका व सहकारी देशांनीही तैवानच्या सहाय्यासाठी मोठी पावले उचलली आहेत.

किंमत मोजावी लागेल, वँग यी

अमेरिकेच्या संरक्षणखर्च विधेयकात तैवानच्या सुरक्षेच्या मुद्याचा उल्लेख व ‘रिम ऑफ पॅसिफिक`सारख्या बहुराष्ट्रीय सरावासाठी तैवानच्या समावेशाचे संकेत याचाच भाग ठरतो. आंतरराष्ट्रीय समुदायाचे तैवानबरोबरील वाढते सहकार्य चीनला अधिकाधिक अस्वस्थ करीत असून त्याला इशाऱ्यांच्या रुपात प्रत्युत्तर देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री वँग यी यांचा इशाराही याच प्रत्युत्तराचा भाग दिसतो. चीनच्या ‘तैवान अफेअर्स ऑफिस`चे प्रवक्ते मा शिओगुआंग यांनीही, तैवानमधील विघटनवादी गटांनी चिथावणी दिली तर टोकाची पावले उचलण्यात येतील, असे बजावले आहे.

दरम्यान, चीनने 2021 सालात तब्बल 961 वेळा तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली आहे. 2020च्या तुलनेत यात तिपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. पुढील वर्षी याची तीव्रता अधिक वाढलेली असेल, अशी चिंता तैवानी विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. चीनकडून करण्यात येणारी ही घुसखोरी ‘ग्रे झोन वॉरफेअर`चा भाग असल्याचे मानले जाते.

हिंदी     English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info