युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाचे मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले

- अमेरिकेच्या ‘पॅट्रिऑट डिफेन्स सिस्टिम’ला लक्ष्य केल्याचा रशियाचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युरोपिय देशांकडून शस्त्रसहाय्य मिळविण्यात व्यस्त असतानाच रशियाने राजधानी किव्हवर जबरदस्त हल्ले चढविले. सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यांमध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर करण्यात आला. हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ला लक्ष्य केल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. मात्र युक्रेन व अमेरिकेने हा दावा फेटाळला आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर राजधानी किव्हवर झालेला हा सर्वात प्रखर हल्ला असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.

राजधानी किव्हवर

गेल्या काही दिवसात युक्रेनने रशियाला एकापाठोपाठ एक असे धक्के दिल्याची माहिती समोर आली होती. राजधानी मॉस्कोसह रशियाच्या विविध प्रांतांमध्ये झालेले ड्रोन हल्ले, रशियाच्या प्रगत लढाऊ विमानांची हानी, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा बळी व बचावफळीवर झालेले हल्ले यासारख्या घटनांचा त्यात समावेश होता. सातत्याने बसणाऱ्या हादऱ्यांमुळे रशियन वर्तुळातून संरक्षणदलांविरोधात उठणारे नाराजीचे सूर तीव्र होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर रशियाने राजधानी किव्हवर केलेले हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

राजधानी किव्हवर

सोमवारी रात्री दोन तासांच्या अवधीत रशियन सैन्याने राजधानी किव्हवर तब्बल १८ क्षेपणास्त्रे तसेच १० ड्रोन्सचा मारा केल्याचे सांगण्यात येते. यात सहा ‘किन्झाल’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, नऊ क्रूझ मिसाईल्स व तीन ‘एस-४००’ क्षेपणास्त्रांचा समावेश होता. यातील किन्झाल हायपसोनिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या ‘पॅट्रिऑट’ यंत्रणेला लक्ष्य केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. रशियाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने पॅट्रिऑट यंत्रणेला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येते.

राजधानी किव्हवर

क्षेपणास्त्रांपाठोपाठ इराणच्या आत्मघाती शाहेद ड्रोन्सचाही मारा करण्यात आला. यात किव्हमधील पायाभूत सुविधांसह नागरी वस्त्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे म्हंटले जाते. मे महिन्यात राजधानी किव्हवर हल्ला होण्याची ही आठवी वेळ ठरली आहे. या हल्ल्यांमुळे रशियाच्या संरक्षणक्षमतेवर शंका घेणाऱ्या तसेच तसेच ती घटल्याचे दावे करणाऱ्या पाश्चिमात्यांना चपराक बसल्याचे मानले जाते. हल्ल्यांनंतर रशियन विमाने व ड्रोन्सनी राजधानी किव्हची टेहळणी केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

राजधानी किव्हवर हल्ले करतानाच युक्रेनकडून होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. गेल्या ४८ तासांमध्ये रशियाने युक्रेनचे २२ ड्रोन्स पाडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. तर ब्रिटनने युक्रेनला दिलेल्या प्रगत ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रांना पाडण्यात यश मिळाल्याचेही रशियाने स्पष्ट केले. ब्रिटनची सात क्षेपणास्त्र पाडल्याचे रशियन संरक्षण विभागाने सांगितले.

रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर चीनचे विशेष दूत लि हुई युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. चीनकडून रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हुई युक्रेनमध्ये दाखल झाले असून त्यानंतर ते पोलंड, फ्रान्स व जर्मनीलाही भेट देणार आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info