रशियाला युरोपमध्ये अण्वस्त्रे तैनात करणे भाग पडेल

- उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांचा इशारा

मॉस्को – युरोपमध्ये अण्वस्त्रे तैनात न करण्याचा प्रस्ताव नाटोने नाकारला तर रशियाही युरोपात अण्वस्त्रे तैनात करील, असा इशारा उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला आहे. नाटोने गेल्या महिन्यात सक्रिय केलेली ‘५६ आर्टिलरी कमांड’ व गेल्या काही दिवसात सुरू असलेली वक्तव्ये यातून नाटो युरोपात अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळतात, असा दावाही रिब्कोव्ह यांनी यावेळी केला. रशियाने युक्रेन मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून नाटोची या देशातील तैनाती ही ‘रेड लाईन’ असेल असे यापूर्वीच बजावले आहे.

‘युक्रेनबाबतचा तणाव निवळावा अशी इच्छा असेल तर पाश्‍चात्य देशांनी रशियाला सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक हमी द्यायला हवी. युरोपमध्ये मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रे तैनात करण्यावर बंदी हा त्याचाच भाग आहे. पाश्‍चात्य देश या प्रस्तावात सहभागी झाले नाही तर रशियाला कारवाई करणे भाग पडेल. रशिया लष्करी पातळीवर अण्वस्त्रे तैनात करून प्रत्युत्तर देईल’, असा इशारा उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. नाटो गेल्या काही दिवसांपासून युरोपातील तैनातीबाबत अप्रत्यक्षरित्या संकेत देत असल्यानेच रशियाला हा पवित्रा घेणे भाग पडल्याचेही रिब्कोव्ह यांनी बजावले.

१९८७ साली झालेल्या ‘आयएनएफ ट्रिटी’नुसार, युरोपात मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रे तैनात करण्यावर बंदी घालण्यात आली होती. अमेरिका व रशियामध्ये झालेल्या या करारानंतर दोन्ही देशांनी जवळपास अडीच हजारांहून अधिक मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रे नष्ट केली होती. मात्र २०१९ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आयएनएफ ट्रिटी’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रशियाही करारातून बाहेर पडला. या घडामोडींनंतर अमेरिका व रशिया या दोन्ही देशांनी मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित करण्यासह त्याची चाचणी तसेच तैनातीची तयारी सुरू केल्याचे समोर आले होते. रशियाने आधीच मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्र विकसित केले असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता.

युक्रेनमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमणाची जय्यत तयारी केल्याच्या बातम्या व दावे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. दावे करणारी माध्यमे तसेच यंत्रणांनी त्यासोबत रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती देणारे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केल्याने या भागातील तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ल्याबाबतचे दावे फेटाळले असून उलट अमेरिका व नाटो चिथावणीखोर कारवाया करीत असल्याचा आरोप केला. युक्रेनमधील तणाव निवळावा यासाठी रशियाने एक प्रस्तावही पुढे केला होता.

त्यात नाटोने युक्रेन व जॉर्जियाला सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव सोडून द्यावा आणि या क्षेत्रातील संरक्षणतैनाती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अमेरिका व नाटोने रशियाची ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे रशिया अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. अण्वस्त्रतैनातीच्या इशार्‍यापूर्वी रिब्कोव्ह यांनी, युक्रेन हा रशियाविरोधी कारवायांसाठी नवा तळ बनणार नाही याची हमी द्या अन्यथा मोठ्या संघर्षाचा धोका पत्करा, असे बजावले होते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info