मॉस्को – २५,५६० किलोमीटर प्रति तास इतका वेग आणि १८ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी ‘आर-२८ सरमात’ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे पुढच्या काही महिन्यांमध्ये तैनात केली जातील. रशियन संरक्षणदलाच्या सेवेत असलेल्या ‘आर-३६’ आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या जागी ही तैनाती होईल, अशी माहिती रशियाच्या ‘स्टॅटेजिक मिसाईल फोर्सेस’चे कमांडर कर्नल जनरल सर्जेई काराकायेव्ह यांनी दिली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी २०१८ साली अतिप्रगत आणि युद्धाचे पारडे फिरविणार्या सहा शस्त्रांबाबत घोषणा केली होती. यामध्ये अण्वस्त्रांनी सज्ज ‘पोसायडन’ मानवरहीत पाणबुडी, अण्वस्त्रसज्ज ‘ऍव्हनगार्ड’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तसेच अवघ्या काही सेकंदात अमेरिकेचे टेक्सास शहर बेचिराख करण्याची क्षमता असलेल्या ‘सरमात’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश होता. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेने खळबळ उडविली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘सरमात’ची तैनाती हा रशियाने घेतलेला फार मोठा धोरणात्मक निर्णय ठरतो.
गेली काही वर्षे रशिया सायलो किंवा हवाबंद खंदकातून प्रक्षेपित केल्या जाणार्या या सरमात क्षेपणास्त्राची चाचणी करीत होता. सेकंदाला सात किलोमीटर अंतर या वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करू शकते. रशियन यंत्रणांनी सदर क्षेपणास्त्र १८ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते, असे जाहीर केले असले तरी सरमात ३५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य टिपू शकते, अशी माहितीही समोर आली होती. त्याचबरोबर सरमात अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेलाही गुंगारा देऊ शकते, असा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.
या वर्षी सरमातच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून २०२२ सालच्या सुरुवातीपासून या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची तैनाती सुरू होईल. पुढील सात वर्षात ‘आर-२८ सरमात’ क्षेपणास्त्रांच्या आठ रेजिमेंट्स तैनात होणार आहेत. रशियन संरक्षणदलाच्या ताफ्यात असलेल्या ‘आर-३६’ या क्षेपणास्त्रांची जागा सरमात घेणार आहे. ‘आर-३६’ आंतरखंडीय क्षेपणास्त्रे नाटो सदस्य देशांमध्ये ‘सॅटन’ क्षेपणास्त्र म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ‘आर-२८’ क्षेपणास्त्रांच्या तैनातीसंबंधी रशियाने केलेल्या घोषणेकडे नाटोचे सदस्य देश अधिक सावधपणे पाहत आहेत.
युक्रेनच्या मुद्यावरुन रशिया आणि अमेरिका-नाटोमधील तणावात वाढ झाली आहे. अमेरिका रशियावर निर्बंधांच्या धमक्या देत आहे. त्याचबरोबर रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला तर तिसरे महायुद्ध भडकेल व रशियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे अमेरिका व नाटो बजावत आहेत.
दरम्यान, नाटो युरोपात अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी करीत असल्याची चिंता रशियाने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. नाटोने युरोपमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याच्या निर्णयातून माघार घेतली नाही तर रशियाही युरोपात अण्वस्त्रे तैनात करील, असा इशारा रशियन उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला होता.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |