मॉस्को – नाटोबरोबरील तणाव कमी करण्यासाठी रशियाने दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आलाच, तर निराळ्याच पर्यायांचा वापर करून त्याला उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. तर फिनलँड आणि स्वीडन या देशांना नाटोमध्ये सहभागी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर रशियाची करडी नजर रोखलेली आहे. याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्हा यांनी बजावले आहे.
युक्रेनच्या सीमेवर रशियाने एक लाखाहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. नव्या वर्षात रशिया युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचे इशारे अमेरिका देत आहे. रशियाने हा हल्ला चढविलाच, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. यामुळे अमेरिका-नाटोच्या रशियाबरोबरील घनघोर युद्धाची शक्यता बळावल्याचे इशारे युरोपिय देश देत आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्षांनी हा तणाव कमी करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. युक्रेन तसेच रशियाच्या प्रभावक्षेत्रात येणार्या देशांना नाटोत सहभागी करण्याचा विचार सोडून द्या आणि या देशांमध्ये अमेरिका-नाटोचे लष्करी तळ उभारण्याचे प्रयत्न थांबवा, अशी मागणी या प्रस्तावात आहे.
मात्र अमेरिका-नाटोने या प्रस्तावाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पण रशियाबरोबर चर्चा करण्यास नाटो तयार झाल्याचे वृत्त आहे. १२ जानेवारी रोजी ही चर्चा होणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये आली खरी. पण रशियाने दिलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे संकेत अमेरिक व नाटोने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपला प्रस्ताव फेटाळल्यानंतर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव सूचक शब्दात करून दिली. रविवारी रशियाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष पुतिन बोलत होते.
रशियाचा प्रस्ताव नाकारलाच तर त्याला वेगळ्याच पर्यायांद्वारे उत्तर दिले जाईल. हे उत्तर आमच्या ‘मिलिटरी एक्सपर्टस्’कडून आलेल्या प्रस्तावांवर अवलंबून असेल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. त्यांच्याकडून हा इशारा येत असतानाच, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्ह यांनी नाटोला आणखी एक इशारा दिला. फिनलंड आणि स्वीडन या देशांना नाटोत सहभागी करून घेण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर रशियाची करडी नजर आहे. हे दोन्ही देश नाटोत सहभागी झाले तर त्याचे फार मोठे लष्करी व राजकीय परिणाम संभवतात. त्यावर रशियाची प्रतिक्रिया उमटल्यावाचून राहणार नाही’, असे सांगून झकारोव्हा यांनी नाटोला खडसावले आहे.
दरम्यान, नाटो रशियाकडून येत असलेल्या या इशार्यांकडे दुर्लक्ष करून ‘ओपन डोअर पॉलिसी’वर काम करीत आहे. निकष पूर्ण करणार्या देशांना नाटोत सहभागी होता येऊ शकेल, असे नाटोचे सेक्रेटरी-जनरल जॉन स्टोल्टनबर्ग यांनी जाहीर केले आहे. नाटोत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय त्या देशाने घ्यायचा आहे, दुसरे देश त्यावर हुकूमत गाजवू शकत नाही, असे नाटो तसेच अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र रशियाच्या प्रभाव क्षेत्रातील देशांना नाटोचे सदस्य करून घेऊन या देशांमध्ये नाटो व अमेरिकेचे लष्करी तळ उभारणे म्हणजे थेट रशियाला युद्धाचे आव्हान देणे ठरते, असे रशियाचे म्हणणे आहे. ही रेड लाईन ठरते व याच्या उल्लंघनाचे परिणाम सहन करण्याची तयारी ठेवा, असा सज्जड इशारा रशियाने दिलेला आहे.
या पार्श्वभूमीवर, युरोप पुन्हा एकदा घनघोर युद्धाच्या उंबरठ्यावर उभा असून कुठल्याही क्षणी युद्धाचा भडक उडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. युरोपिय देशांनी यावर चिंता व्यक्त केली असली तरी रशियाला युक्रेनवर हल्ला चढविण्याची मोकळीक दिली जाणार नाही, असे नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांचे म्हणणे आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |