कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका

बीजिंग – कोरोना साथीचा उगम असलेल्या चीनमध्ये एकापाठोपाठ एक कोरोनाचे विस्फोट समोर येत आहेत. गेल्या महिन्यात शिआन शहरात सुरू झालेल्या साथीनंतर युझोऊ व तिआन्जिन या मोठ्या शहरांमध्येही साथीचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी`ची अंमलबजावणी सुरू केली. याचे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटके बसण्यास सुरुवात झाली असून त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतही उमटतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेला

2019 सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरात कोरोना साथीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर लॉकडाऊन, मास टेस्टिंग, मोठ्या हॉस्पिटल्सची उभारणी व स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या लसीच्या जोरावर कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचा दावा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केला होता. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहानसह इतर शहरांमध्ये पार्टी तसेच इतर कारणांसाठी झालेल्या गर्दीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र आता चीनच्या अनेक प्रांतांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे समोर येत आहे.

चीनच्या विविध शहरांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खळबळ उडाली. जगातील इतर देशांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या नगण्य असली तरी त्याविरोधात चीनने नेहमीप्रमाणे कठोर निर्बंध असणारी ‘झीरो कोविड पॉलिसी` लागू केली आहे. या धोरणाचा फटका चीनमधील शेकडो कारखाने व उद्योगांना बसला आहे. सॅमसंग व मायक्रॉन टेक्नॉलॉजीस्‌‍ यासारख्या परदेशी कंपन्यांनी आपल्या उत्पादनावर याचा परिणाम झाल्याचे म्हटले आहे. निर्यातीचे केंद्र असणाऱ्या ‘निन्गबो पोर्ट`मध्येही निर्बंध लादण्यात आले असून त्यामुळे जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे ‘सप्लाय चेन`शी निगडित अनेक कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेला

चीनमध्ये एकामागोमाग एक लागू होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आधीच अर्थव्यवस्थेला धक्के बसू लागल्याचे ‘नोमुरा` या वित्तसंस्थेने बजावले आहे. लॉकडाऊनच्या धक्क्यांमुळे 2021च्या अखेरच्या तिमाहित चीनचा आर्थिक विकास दर तीन टक्क्यांपर्यंत खाली येण्याचे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत. तिसऱ्या तिमाहित हाच दर 4.9 टक्के इतका होता.

अर्थव्यवस्थेबरोबरच चीनमधील अंतर्गत समस्याही गंभीर रुप धारण करीत असल्याचे समोर येत आहे. लॉकडाऊन लागू केलेल्या शहरांमध्ये स्थानिक जनतेला अन्नधान्य व योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडिया व इतर माध्यमांमधून समोर येऊ लागल्या आहेत. अनेक कुटुंबांना तीन ते चार दिवस भाज्या तसेच इतर अन्नधान्याचा पुरवठा झाला नसल्याचे उघड झाले आहे. काही भागांमध्ये लोकांनी अन्नधान्यासाठी घरातील मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण केल्याची वृत्तेही प्रसिद्ध झाली आहेत. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ओढविली असून काही ज्येष्ठ नागरिकांचा उपचार न मिळाल्याने घरातच मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info