२०२२मधील पहिल्या दोन आठवड्यांमध्येच चीनच्या ५०हून अधिक विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

- आक्रमणापूर्वीची तालीम असल्याचा विश्‍लेषकांचा दावा

बीजिंग/तैपेई – तैवानच्या हवाईहद्दीत गेल्या वर्षात ९००हून अधिक विमानांची घुसखोरी केल्यानंतर यावर्षी त्याची तीव्रता अधिक वाढविण्याचे संकेत चीनच्या संरक्षणदलाने दिले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच चीनच्या ५०हून अधिक विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. चीनच्या घुसखोरीच्या या वाढत्या घटना म्हणजे तैवानवरील आक्रमणापूर्वीची तालीम असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

तैवानच्या हद्दीत घुसखोरी

गेल्या काही महिन्यात चीन तैवानच्या मुद्यावरून अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील’, असे जिनपिंग यांनी बजावले होते. हा इशारा देत असतानाच चीनने तैवाननजिकच्या क्षेत्रातील संरक्षणदलांच्या हालचालींनाही वेग दिला आहे.

जून महिन्यापासून ‘साऊथ चायना सी’मध्ये सातत्याने युद्धसराव सुरू असून यात तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम असणार्‍या सरावांचाही समावेश आहे. दुसर्‍या बाजूला चीनच्या मच्छिमारी जहाजांचा व बोटींचा समावेश असणारा ‘नेव्हल मिलिशिआ’ तैवानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी करीत असल्याचे समोर आले आहे. चीनची लढाऊ विमाने व युद्धनौकाही तैवानच्या क्षेत्रात धडका देत आहे.

तैवानच्या हद्दीत घुसखोरी

गेल्या वर्षी चीनच्या तब्बल ९६१ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली होती. २०२०च्या तुलनेत यात तिपटीने वाढ झाल्याचेही यात सांगण्यात आले होते. त्याचवेळी, पुढील वर्षी याची तीव्रता अधिक वाढलेली असेल, अशी चिंता तैवानी विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती. नव्या वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या १५ दिवसांमध्येच तब्बल ५९ चिनी विमाने तैवानच्या हवाईहद्दीत घुसल्याचे समोर आले आहे. १५ पैकी १३ दिवस चीनच्या विमानांनी घुसखोरी केल्याची माहिती संरक्षणविभागाकडून देण्यात आली आहे.

चीनच्या विमानांची ही वाढती घुसखोरी तैवानवर करण्यात येणार्‍या संभाव्य आक्रमणाची रंगीत तालीम असल्याचा इशारा विश्‍लेषकांनी दिला आहे. सातत्याने करण्यात येणारी घुसखोरी हा तैवानला धमकावण्याचा प्रयत्न असून तैवानची संरक्षणक्षमता खच्ची करण्यासाठी हे घडविण्यात असल्याचा दावाही विश्‍लेषकांनी केला आहे. दरम्यान, चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकडून अतिरिक्त पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय तैवानने घेतला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info