सना – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने येमेनमध्ये हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ७७ जण ठार झाले. आठवड्याच्या सुरुवातीला हौथी बंडखोरांनी युएईच्या राजधानीवर चढविलेल्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना उत्तर म्हणून अरब देशांच्या लष्करी आघाडीने ही कारवाई केली. पण सौदीने सादा शहरातील तुरुंगाला लक्ष्य केले असून यामध्ये नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप हौथी बंडखोरांनी केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटले असून संयुक्त राष्ट्रसंघाने याची दखल घेऊन अरब देशांना हल्ले रोखण्याचे आवाहन केले आहे.
पाच दिवसांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीवर ड्रोन्स आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. यामध्ये दोन भारतीयांचा बळी गेला होता. आपली ही कारवाई म्हणजे युएईच्या राजवटीला इशारा असल्याचे सांगून हौथी बंडखोरांनी येत्या काळातही युएईच्या ठिकाणांवर हल्ले चढविले जातील, असे हौथींनी धमकावले होते. यानंतर सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले.
शुक्रवारी येमेनच्या उत्तरेकडील सादा तसेच पश्चिमेकडील हौदेदा शहरांमधील हौथी बंडखोरांच्या तळांवर अरब देशांच्या लष्करी आघाडीने हवाई हल्ले चढविले. यापैकी सादा शहरातील हल्ल्यांमध्ये ७७ जण ठार झाले. हौथी बंडखोरांशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सौदीच्या लढाऊ विमानांनी येथील तुरुंगावर हल्ले चढविले. यामध्ये ७७ जणांचा बळी गेल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. स्थानिक मानवाधिकार संघटनांनी देखील या बातमीला दुजोरा दिला.
तर पुढच्या काही तासात हौदेदा शहरातील टेलिकॉम कंपनीची इमारत उद्ध्वस्त केली. ही कंपनी हौथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे सौदीप्रणित लष्करी आघाडीने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. यामुळे येमेनमधील इंटरनेट व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा दावा स्थानिक मानवाधिकार संघटनांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिवन अँटोनियो गुतेरस यांनी या दोन्ही घटनांची नोंद घेऊन सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या आघाडीवर टीका ककरून हे हल्ले थांबविण्याचे आवाहन केले आहे.
पण अरब देशांच्या लष्करी आघाडीने हे आरोप फेटाळले. आपण हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवरच हल्ले चढविले होते. संबंधित ठिकाणी नागरी वस्ती नसल्याचे निश्चित केल्यानंतरच कारवाई केल्याची माहिती अरब देशांच्या लष्करी आघाडीचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी दिली. तसेच हौथी बंडखोर चुकीची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मलिकी यांनी केला.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये येमेनमधील हौथी बंडखोरांचे हल्ले तीव्र झाले आहेत. गेल्या वर्षी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविणार्या हौथींनी युएईच्या राजधानीलाही लक्ष्य केले आहे. यामुळे खवळलेले अरब देश हौथींवर जोरदार हल्ले चढवू शकतात, असा इशारा युरोपिय माध्यमे देत आहेत. असे झाले तर येमेनमधील या संघर्षात इराण उडी घेईल. त्यानंतर आखातात सौदी विरुद्ध इराण असा संघर्ष भडकेल, असे युरोपिय विश्लेषक बजावत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |