तुर्की भूमध्य सागरात इंधन उत्खनन करीत राहिल – राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन

अंकारा – भूमध्य सागरातील पूर्व क्षेत्रात नैसर्गिक इंधनवायूचा साठा असल्याचे संकेत मिळत असून त्याच्या उत्खननाची मोहीम तुर्की सुरुच ठेवेल, असे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी बजावले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या नाटो बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर तुर्की व ग्रीसच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर ग्रीस व तुर्कीमध्ये असलेला तणाव निवळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र तुर्की राष्ट्राध्यक्षांनी इंधन उत्खननासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने दोन देशांमधील तणाव पुन्हा एकदा चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती.

तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती वाढविली होती. त्याचवेळी फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला होता. युरोपिय महासंघ तसेच नाटोच्या माध्यमातून तुर्कीवर राजनैतिक दबाव टाकण्याचेही प्रयत्न केले होते. ग्रीसची ही आक्रमकता व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आलेल्या दडपणामुळे तुर्कीला माघार घेणे भाग पडले होते. अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर बायडेन प्रशासनानेही आपले समर्थन ग्रीसला राहिल, असे संकेत दिल्याने तुर्की अडचणीत आल्याचे मानले जात होते.

मात्र गेल्या आठवड्याभरात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच एर्दोगन यांनी 20 जुलै रोजी ‘सायप्रस’मधील तुर्कीश भागाला भेट देण्याचे जाहीर केले होते. 1974 साली तुर्कीने सायप्रसवर आक्रमण करून काही भाग ताब्यात घेतला होता. या मोहिमेची आठवण म्हणून ‘तुर्कीश सायप्रस’ला भेट देणार असल्याचे तुर्की सरकारकडून सांगण्यात आले आहे. एर्दोगन यांच्या या भेटीवर ग्रीससह युरोपिय महासंघाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

सायप्रसच्या मुद्यावरून वाद कायम असतानाच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इंधन उत्खननाचा मुद्दा उपस्थित करून ग्रीसबरोबरील वादाला नवी चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. ‘भूमध्य सागरातील पूर्व क्षेत्रात इंधनाचे साठे असल्याची माहिती तुर्कीला मिळाली आहे. या क्षेत्रात तुर्की इंधन उत्खनन सुरु करणार आहे. या क्षेत्रावर तुर्कीचा हक्क असून, त्याचा पुरेपूर वापर करण्यात येईल. भूमध्य सागराचा पूर्व भाग, सायप्रस व नजिकच्या सागरी क्षेत्रात तुर्कीकडून उत्खनन मोहीम राबविण्यात येईल’, असे एर्दोगन यांनी म्हंटले आहे.

एर्दोगन यांच्या वक्तव्यावर ग्रीसने प्रतिक्रिया दिली नसली तरी युरोपिय महासंघाने तुर्कीला यापूर्वीच निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्यामुळे तुर्कीने भूमध्य सागरात नवी मोहीम राबविल्यास महासंघाकडून आक्रमक कारवाई होऊ शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info