स्वातंत्र्यदिनी ‘मेरिटाईम थिएटर कमांड`ची घोषणा

नवी दिल्ली – या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी संरक्षणदलांच्या पहिल्या थिएटर कमांडची घोषणा होणार आहे. नौदलाने आयोजित केलेली तिन्ही संरक्षणदलाची बैठक काही दिवसांपूर्वी संपन्न झाली होती. या बैठकीत यावर चर्चा झाली असून स्वातंत्र्यदिनी ‘मेरिटईम थिएटर कमांड`ची स्थापना होऊ शकते, असा दावा केला जातो. देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी तिन्ही संरक्षणदलांचा समावेश असलेल्या थिएटर कमांडची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट करून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले होते.

स्वातंत्र्यदिनी

बदलत्या काळात युद्धतंत्र बदलत चालले असून त्यामुळे देशासमोर असलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांमध्येही वाढ होत आहे. यामुळे तिन्ही संरक्षणदलांमधील समन्वय वाढवून या धोक्यांचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्‍यकताही वाढली होती. यासाठी संरक्षणदलप्रमुखपदाची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 2019 साली जनरल बिपीन रावत देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख बनले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली संरक्षणदलांच्या ‘युनिफाईड थिएटर कमांड` अर्थात संयुक्त कमांडच्या रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

ही प्रकिया आता अधिक गतीमान झाली असून लवकरच देशाला पहिले ‘मेरिटाईम थिएटर कमांड` मिळेल. यासाठी नौदलाने तिन्ही संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या बैठकीचे आयोजन केले होते. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये ही बैठक पार पडली होती. नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे व्हाईस ॲडमिरल अजयेंद्र बहादूर सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत ‘मेरिटाईम थिएटर कमांड`च्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

2022 सालच्या एप्रिल महिन्यापर्यंत थिएटर कमांडबाबतचा आराखडा व यावर झालेला अभ्यास ‘डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स`कडे सुपूर्द करण्याची सूचना त्यावेळी संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी केली होती. प्रस्तावित करण्यात आलेल्या आराखड्यानुसार देशाच्या संरक्षणदलांचे चार थिएटर कमांड उभारण्यात येणार आहेत. सध्या नौदल, वायुसेना आणि लष्कराचे मिळून 17 सर्व्हिस कमांड कार्यरत आहेत. यात लष्कराच्या सात कमांडस्‌‍चा समावेश आहे.

संरक्षणदलांच्या युनिफाईड थिएटर कमांडच्या रचनेमुळे तिन्ही संरक्षणदलांना याचा संयुक्तरित्या लाभ घेता येऊ शकेल. याने देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल. त्याचवेळी संरक्षणदलांमधील समन्वय अधिकच वाढणार असून त्यांच्यावर ताण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info