इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याची हीच वेळ आहे

- इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारा

जेरूसलेम/वॉशिंग्टन – इराणने अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन ८४ टक्के शुद्धतेपर्यंत नेले आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी युरेनियमचे संवर्धन ९० टक्के शुद्ध असावे लागते. त्यामुळे अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने पावले टाकणाऱ्या इराणला आत्ताच रोखावे लागेल. अन्यथा कधीही रोखता येणार नाही’, असा इशारा इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ताची हानेबी यांनी दिला. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या या माहितीच्या आधारे अमेरिकेने इराणला लष्करीदृष्ट्या धोकादायक देश म्हणून घोषित करावे, अशी मागणी इस्रायलने केली आहे.

अण्वस्त्र

गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या दोन वृत्तसंस्थांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचा हवाला देऊन खळबळ उडवून देणारी माहिती प्रसिद्ध केली आहे. इराणने ८४ टक्के शुद्धतेचे युरेनियमचे संवर्धन केले आहे, अशी माहिती दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली. आयोगाच्या अहवालात तसे नमूद करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या ९० टक्केच्या प्रमाणापासून इराण अजून सहा टक्के दूर आहे. त्यामुळे इराणने हेतूपूर्वक इतक्या शुद्धतेचे युरेनियम संवर्धन केले की चुकीने हे घडले आहे, याचा तपास आयोग करीत असल्याचेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अण्वस्त्र

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या या बातमीची दखल घेत इराणने आपली बाजू मांडली. ही बातमी वस्तूस्थितीपासून भरकटलेली असल्याचे इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रवक्ते बेहरूझ कमालवंदी यांनी स्पष्ट केले. तसेच इराणने ६० टक्के शुद्धतेचे युरेनियम संवर्धन केल्याचे सांगून पाश्चिमात्य माध्यमांनी केलेले आरोप कमालवंदी यांनी धुडकावले. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित सदर वृत्ताबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र इराणचा अणुकार्यक्रम आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलने सदर बातमीचा आधार घेऊन इशारा प्रसिद्ध केला.

अण्वस्त्र

‘इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत समोर येणारी माहिती चिंताजनक आहे. इराणचा हा अणुकार्यक्रम नागरी नाही तर लष्करी वापरासाठी सुरू आहे. गेली कित्येक वर्षे इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता’, असे इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ताची हानेबी म्हणाले. येत्या ६ मार्च रोजी व्हिएन्ना येथे अणुऊर्जा आयोगाची विशेष बैठक होणार आहे. त्यावेळी इराणविरोधात कठोर भूमिका घेण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे आवाहन हानेबी यांनी केले.

दरम्यान, इराण अणुबॉम्बच्या निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचलेला असताना अमेरिकेनेच इराणला लष्करी धमकी द्यावी, असे आवाहन इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी केले. तर बाहरिन येथे तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे प्रमुख वाईस ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणच्या आण्विक हालचालींवर नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info