अमेरिका व नाटोने रशियाचा प्रस्ताव नाकारला

- रशियाकडून तीव्र नाराजी

मॉस्को/वॉशिंग्टन – गेल्या शतकातील सोव्हिएत संघराज्याचा भाग असलेल्या देशांना सदस्य बनविण्यापासून नाटोने दूर रहावे, ही प्रमुख मागणी असणारा रशियाचा प्रस्ताव अमेरिका व नाटोने फेटाळला. अमेरिका व नाटोने बुधवारी रात्री रशियाच्या प्रस्तावावर लेखी उत्तर सादर केले. त्यात रशियाची मुख्य मागणी नाकारण्यात आल्याची माहिती रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिली आहे. अमेरिका व नाटोकडून देण्यात आलेल्या प्रतिसादावर रशियाने नाराजी व्यक्त केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यावर लवकरच निर्णय घेतील, असे म्हटले आहे.

रशियाचा प्रस्ताव

रशियाने युक्रेन सीमेवर वाढविलेल्या लष्करी तैनातीमुळे युरोपसह आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा तणाव कमी करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या महिन्यात ‘सिक्युरिटी पॅक्ट’चा प्रस्ताव पुढे केला होता. रशियाने दिलेल्या प्रस्तावात, नाटोने युक्रेन व जॉर्जियासह एकेकाळी ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असणार्‍या कोणत्याही देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी नाटोने पूर्व तसेच मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घ्यावी व रशियन सीमेनजिकचे सराव थांबवावे, असेही म्हटले होते. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांनी परस्परांच्या प्रभावक्षेत्रानजिक हल्ला चढविता येईल, अशी लढाऊ विमाने व युद्धनौका पाठविण्यावर बंदी घालावी, असेही रशियाने प्रस्तावात नमूद केले होते.

आपल्या प्रस्तावावर अमेरिका व नाटोने लेखी प्रतिसाद द्यावा अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत अमेरिका व नाटोने रशियाला उत्तर पाठविले. बुधवारी रात्री रशियन सरकारला हे उत्तर सादर करण्यात आले. त्यानंतर रशियाकडून नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका व नाटोने रशियाच्या मुख्य मागणीचा विचारच केलेला नसून इतर बाबींवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी सांगितले. अमेरिका व नाटोने दिलेल्या उत्तरात कोणत्याही मुद्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, अशी टीकाही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

रशियाचा प्रस्ताव

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अमेरिका व नाटोचा लेखी प्रतिसाद राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्याचवेळी रशिया त्याला लवकरच प्रत्युत्तर देईल, असा दावाही केला. अमेरिका व नाटोने रशियाच्या प्रमुख मागण्या फेटाळल्याने रशियाकडून आक्रमक प्रत्युत्तर मिळेल, असे संकेत दिले जात आहेत.

दरम्यान, युक्रेनवरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने आपल्या युद्धनौका ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात पाठविल्याचे समोर आले आहे. त्यात विनाशिका व ‘ऍम्फिबियस ऍसॉल्ट शिप्स’सह २० युद्धनौकांचा समावेश आहे. त्याचवेळी आर्क्टिक क्षेत्राचा भाग असणार्‍या ‘बॅरेन्ट्स सी’मध्येही नौदलाचा युद्धसराव सुरू झाल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली आहे.

युक्रेनच्या जवानाकडून मिलिटरी फॅक्टरीत अंदाधुंद गोळीबार – पाच ठार, अनेक जण जखमी

किव्ह – युक्रेनच्या ‘नॅशनल गार्ड’चा भाग असलेल्या जवानाने मिसाईल फॅक्टरीत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. डिनप्रो शहरातील या फॅक्टरीत युक्रेनी लष्करासाठी लागणारी क्षेपणास्त्रे तसेच रॉकेट्सची निर्मिती होते.

काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनमध्ये आपले एजंट घुसविल्याचे तसेच त्यांना घातपात व हिंसाचार घडविण्याच्या सूचना दिल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे रशिया व युक्रेनमधील संभाव्य संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अशा महत्त्वाच्या उपक्रमात गोळीबाराची घटना लक्ष वेधून घेत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info