अमेरिकेच्या स्पाय प्लेनची घुसखोरी हे चिथावणीखोर कृत्य – चीनचा खरमरीत इशारा

बीजिंग – चीनच्या संरक्षणदलांकडून सुरू असणाऱ्या ‘लाईव्ह फायर’ सरावादरम्यान अमेरिकेने स्पाय प्लेनच्या सहाय्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हे चिथावणीखोर कृत्य असून त्यातून एखादी दुर्घटना घडू शकते, असा खरमरीत इशारा चीनने दिला आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सध्या तीन वेगवेगळ्या भागात युद्धसराव सुरू आहेत. त्यातील ‘नॉर्दर्न थिएटर कमांड’कडून सुरू असणाऱ्या सरावादरम्यान अमेरिकेच्या ‘यू-२ स्पाय प्लेन’ने ‘नो फ्लाय झोन’मध्ये घुसखोरी केल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला. अमेरिकेने हा आरोप स्पष्ट शब्दात फेटाळला असून आपल्या मोहिमा यापुढेही चालू राहतील असे बजावले आहे. अमेरिका व चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लष्करी सामर्थ्याचे जबरदस्त प्रदर्शन सुरू असून, त्यातून संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशारा विश्लेषकांनी यापूर्वीच दिला आहे.

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सध्या एकाच वेळी तीन सागरी क्षेत्रात युद्धसराव सुरू आहे. त्यात साऊथ चायना सी, तैवानचे आखात व ‘यल्लो सी’ यांचा समावेश आहे. तीन वेगवेगळ्या क्षेत्रात हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर कसे देता येईल याचा अभ्यास सुरू असून, एकाच वेळी तीन वेगळ्या सागरी क्षेत्रांमध्ये सराव आयोजित केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘नॉर्दर्न थिएटर कमांड’कडून कोरियानजिक असलेल्या ‘यल्लो सी’मध्ये सराव सुरू आहे. नौदलकडून सुरू असणाऱ्या या ‘लाईव्ह फायर एक्ससाइज’साठी चीनने ‘नो फ्लाय झोन’ची घोषणा केली होती.

मंगळवारी चीनच्या ‘शान्डॉंग’ या विमानवाहू युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली सराव सुरू होता. त्यावेळी अमेरिकेच्या ‘यू-२’ या स्पाय प्लेनने सरावासाठी घोषित केलेल्या ‘नो फ्लाय झोन’मध्ये प्रवेश केला, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. ‘अमेरिकेच्या स्पाय प्लेनची घुसखोरी हा सरावात केलेला गंभीर हस्तक्षेप ठरतो. चीन व अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या हवाई तसेच सागरी क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. अमेरिकेची ही कारवाई म्हणजे चिथावणीखोर कृत्य ठरते’, असा खरमरीत इशारा चीनच्या संरक्षणविभागाचे प्रवक्ते कर्नल वु किआन यांनी दिला.

अमेरिकन स्पाय प्लेनच्या हालचालींमुळे एखादा मोठा अपघात अथवा त्याहून भयंकर गोष्टही घडू शकली असती, असा आरोपही चीनच्या संरक्षण विभागाने केला. चीनच्या संरक्षण तसेच परराष्ट्र विभागाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. अमेरिकेचे हे ‘स्पाय प्लेन’ दक्षिण कोरियातील लष्करी तळावरून धाडण्यात आले होते, असा दावाही चीनच्या लष्करी सूत्रांकडून करण्यात आला आहे. चीनचा आरोप व इशारे अमेरिकेने स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत.

‘यू-२ची मोहीम विमानांसाठी आखण्यात आलेले आंतरराष्ट्रीय नियम व चौकटीतच होती. यापुढेही अमेरिकेचा पॅसिफिक क्षेत्रातील हवाईतळ आंतरराष्ट्रीय नियम व अमेरिकेच्या धोरणांनुसार वेळोवेळी अशा सक्रिय मोहिमा राबविल’, या शब्दात अमेरिकेने चीनचे सर्व दावे धुडकावून लावले. ‘यू-२’ हे ‘हाय अल्टिट्यूड रिकनेसन्स एअरक्राफ्ट’ असून कोणत्याही प्रकारच्या हवामानात ७० हजार फुटांवरून सलग १२ तास उड्डाण करण्याची क्षमता या विमानात आहे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ हे ‘स्पाय प्लेन’ अमेरिकेच्या संरक्षणदलात कार्यरत आहे.

मंगळवारी ‘यू-२’ विमानाच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच, बुधवारी अमेरिकेच्या ‘आरसी-१३५एस’ या टेहळणी विमानाने ‘साऊथ चायना सी‘मधून प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. चीनच्या ‘हैनान आयलंड’नजिक ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून युद्धसराव सुरू आहे. या सराव क्षेत्रानजिक अमेरिकी विमानाने टेहळणी केल्याचा दावा, चिनी अभ्यासगटाने केला आहे. अमेरिकी विमानांच्या या हालचालींवर चिनी प्रसारमाध्यमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी दैनिकाने, १९६०-७० च्या दशकात चीनच्या संरक्षणदलांनी अमेरिकेची पाच टेहळणी विमाने पाडली होती, याची आठवण करून दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info