चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर जपानकडून संरक्षण धोरणात मोठ्या बदलांचे संकेत

- शत्रूच्या तळांवर हल्ला चढविण्यासाठी क्षमता प्राप्त करणार

टोकिओ/बीजिंग – चीन व उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर जपानने आपल्या संरक्षण धोरणात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यात जपानच्या संरक्षणदलांना शत्रूच्या तळांवर हल्ला चढविण्यासाठी क्षमता प्राप्त करण्याचा समावेश आहे. त्याचबरोबर ‘नॅशनल डिफेन्स प्रोग्राम गाईडलाईन्स’ व ‘मिडियम टर्म डिफेन्स प्रोग्राम’मध्येही बदल करण्यात येणार आहेत. जपान सरकारने या मुद्यावर चर्चा सुरू केली असून पंतप्रधान किशिदा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर

गेल्या काही वर्षात चीन तसेच उत्तर कोरियाकडून आक्रमक हालचाली सुरू आहेत. चीन जपाननजिकच्या सागरी हद्दीत सातत्याने युद्धनौका तसेच गस्तीनौका धाडत असून काही महिन्यांपूर्वी एका पाणबुडीचाही वावर आढळला होता. चीनने रशियन युद्धनौकांच्या सहाय्याने जपानच्या सागरी हद्दीजवळ गस्ती मोहीम देखील राबविली होती. दुसर्‍या बाजूला उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रक्षमता वाढविण्याच्या हालचाली सुरू असून गेल्या काही महिन्यात नव्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.

यामुळे जपानच्या सुरक्षेला असणारा धोका वाढला आहे. चीन व उत्तर कोरियाच्या धोक्यापासून मुकाबला करण्यासाठी जपानकडून सातत्याने संरक्षणसामर्थ्यात भर टाकण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी संरक्षणखर्चही वाढविण्यात येत असून गेल्यावर्षी त्यात अतिरिक्त भर टाकण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात, जपानच्या मंत्रिमंडळाने ६.८ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणखर्चाला मंजुरी दिली होती. हा निधी प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स व इतर शस्त्रास्त्रांसाठी वापरण्यात येईल, असे संकेत देण्यात आले होते.

वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर

वाढीव संरक्षणखर्चाचे समर्थन करताना जपानच्या पंतप्रधानांनी शत्रूच्या तळावरील हल्ल्याच्या क्षमतेबाबत उल्लेख केला होता. ‘जपानचे संरक्षणसामर्थ्य वाढविण्यासाठी आपण सर्व पर्यायांचा विचार करु. त्यात शत्रूच्या तळावर हल्ला चढविण्यासाठी योग्य क्षमता मिळविण्याचाही समावेश असेल’, असे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी म्हटले होते. त्यानंतर आता जपान सरकारने औपचारिक पातळीवर त्यासाठी हालचाली सुरू केल्या असून माजी संरक्षणमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात येत आहे. त्यासाठी बुधवारी स्वतंत्र बैठक झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. याच बैठकीत संरक्षण धोरणासह ‘नॅशनल डिफेन्स प्रोग्राम गाईडलाईन्स’ व ‘मिडियम टर्म डिफेन्स प्रोग्राम’मध्ये बदलाच्या मुद्यावरही चर्चा झाली.

दरम्यान, तैवानप्रमाणेच जपानलाही चीनच्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा मुकाबला करावा लागत असल्याचे समोर येत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत जवळपास ७८५ विमानांनी जपानच्या हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यातील ५७१ विमाने चीनची तर उर्वरित रशियाची होती, अशी माहिती जपानच्या संरक्षणदलाने दिली.

चिनी विमानांचे घुसखोरीचे प्रयत्न गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक संख्या असल्याचेही जपानने सांगितले. या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे जपानच्या हवाईदलावर प्रचंड ताण येत असल्याचे वृत्तही देण्यात आले आहे. चीनच्या विमानांची सर्वाधिक घुसखोरी ओकिनावा आयलंड भागात झाली आहे. या बेटावर अमेरिकेचे ३२ लष्करी तळ सक्रिय आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info