पोलंडच्या सीमेनजिक असलेल्या युक्रेनच्या संरक्षणतळावर रशियाकडून क्षेपणास्त्रहल्ले

- ३५ ठार व शेकडो जखमी झाल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असणार्‍या युक्रेनमधील संरक्षणतळावर रशियाने जबरदस्त हल्ला चढविला आहे. रविवारी पहाटे करण्यात आलेल्या या हल्ल्यात ३५ जण ठार तर १००हून अधिक जखमी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला. हा हल्ला करतानाच, नाटोकडून युक्रेनला पुरविण्यात येणारा शस्त्रसाठा हा रशियन हल्ल्यांचे लक्ष्य ठरेल, असा खरमरीत इशारा उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला आहे.

संरक्षणतळावर

रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हला पूर्ण वेढा घातला असून मुख्य सीमेपासून त्या अवघ्या काही किलोमीटर्सच्या अंतरावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियन लष्कराबरोबर चेचेनच्या तुकड्यादेखील असून चेचेन नेते रमझान कादिरोव्ह यांनी त्याचे व्हिडिओदेखील प्रसिद्ध केले आहेत. पुढील काही तासात किव्हच्या ताब्यासाठी निर्णायक संघर्षाला सुरुवात होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. युक्रेनची राजधानी किव्ह पुतिन यांच्यासाठी ‘स्टॅलिनग्रॅड’ ठरेल, असा टोला युक्रेनच्या नेत्यांनी लगावला होता. या पार्श्‍वभूमीवर हा संघर्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मात्र राजधानी किव्हबरोबरच युक्रेनमधील इतर भागांवर ताबा मिळविण्यासाठी रशियाची आगेकूच सुरू झाली आहे. पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतातील वोल्नोव्हाका हे शहर रशियन बॉम्बहल्ल्यात पूर्ण बेचिराख झाल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. तर किव्हपासून ६५ किलोमीटरवर असलेल्या इवानकिव्ह शहरावर रशियन लष्कराने पूर्ण ताबा मिळविल्याचे सांगण्यात येते. या शहराचा वापर किव्हवरील हल्ल्यांसाठी तळ म्हणून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

संरक्षणतळावर

पूर्व युक्रेन व किव्हमधील कारवाईबरोबरच रशियन फौजांनी पश्‍चिम युक्रेनमध्येही जोरदार हल्ले सुरू केले आहेत. युरोपमधील नाटोचा सदस्य देश असणार्‍या पोलंडच्या सीमेपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असणार्‍या ‘यावोरिव्ह मिलिटरी कॉम्प्लेक्स’वर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या हल्ल्यांमध्ये रशियाने तब्बल ३० क्रूझ मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या या जबरदस्त हल्ल्यात तळावरील ३५ जण ठार झाले असून १३४ जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. रशियाचा हा हल्ला युक्रेनला शस्त्रपुरवठा व इतर सहाय्य पुरविणार्‍या युरोपातील नाटोच्या सदस्य देशांना दिलेला इशारा असल्याचे मानले जाते.

या हल्ल्यापूर्वी, रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी युक्रेनला पुरविण्यात येणारा शस्त्रसाठा रशियाच्या हल्ल्यांचे लक्ष्य असू शकतो, असे बजावले होते. अमेरिका इतर नाटो देशांच्या सहाय्याने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरवित आहे आणि ही अत्यंत घातक गोष्ट ठरते, असेही रिब्कोव्ह यांनी आपल्या इशार्‍यात म्हटले आहे. रशियन मंत्र्यांचा हा इशारा समोर येत असतानाच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पुरविण्यासाठी २० कोटी डॉलर्सचा अतिरिक्त निधी मंजूर केल्याची माहिती उघड झाली आहे. अवघ्या २४ तासांपूर्वी, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनमध्ये हे सैन्य घुसवून अमेरिका ‘तिसरे महायुद्ध’ सुरू करणार नाही, असे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनला जाहीर झालेले नवे संरक्षणसहाय्य अमेरिकेची दुटप्पी भूमिका दाखवून देणारे ठरते.

तात्पुरत्या काळासाठी भारत युक्रेनमधील दुतावास पोलंडमध्ये नेणार

नवी दिल्ली – रशियन लष्कराने युक्रेनची राजधानी किव्हसह पश्‍चिम युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी किव्हला रशियन लष्कराने घेरले असून कुठल्याही क्षणी राजधानी किव्हसह पश्‍चिम युक्रेनमधील शहरे रशियन लष्कराच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत भारताने युक्रेनमधील आपला दूतावास तात्पुरत्या काळासाठी पोलंडमध्ये नेण्याची घोषणा केली.

युक्रेनमधील परिस्थिती वेगाने बिघडत चालली असून पश्‍चिम युक्रेनवरील हल्लेही वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनमधील दूतावास तात्पुरत्या स्वरुपात पोलंडमध्ये नेला जाईल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी प्रसिद्ध केली. यापुढील घडामोडींचा नव्याने अभ्यास करून यापुढील निर्णय घेण्यात येतील, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनची राजधानी किव्हमधील भारतीय दूतावासातील बहुतांश कर्मचारी लिव्ह या शहरातून दूतावासाचे काम पार पाडत आहेत.

पश्‍चिम युक्रेनमधील आणि पोलंडपासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर लिव्ह शहर आहे. येथे उभारण्यात आलेल्या भारतीय दूतावासाच्या तात्पुरत्या कॅम्प ऑफिसमधून युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न झाले होते. लिव्हमार्गे भारतीयांना पोलंडमध्ये नेण्यात आले व त्यांची सुटका करण्यात आली होती. याशिवाय रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोवा या शेजारी देशांमधूनही भारतीयांना बाहेर काढण्यात आले होते. पण आता पश्‍चिम युक्रेनवरही रशियाचे हल्ले तीव्र होऊ लागल्यानंतर भारताने आपला दूतावास तात्पुरत्या काळासाठी पोलंडमध्येच नेण्याचे निश्‍चित केले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info