रशियाची लढाऊ विमाने पाडणारा ‘घोस्ट ऑफ किव्ह’ वैमानिक म्हणजे केवळ दंतकथा

- युक्रेनच्या हवाईदलाची कबुली

‘घोस्ट ऑफ किव्ह'

किव्ह/मॉस्को – युक्रेनमध्ये लष्करी मोहीम राबविणाऱ्या रशियाची 40 लढाऊ विमाने पाडणारा ‘घोस्ट ऑफ किव्ह’ उपाधी मिळालेला वैमानिक ही निव्वळ दंतकथा असल्याची कबुली युक्रेनच्या हवाईदलाने दिली आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या हवाईदलातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर तो ‘घोस्ट ऑफ किव्ह’ असल्याचे दावे माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. मात्र हे दावे खरे नसल्याचा खुलासा करताना युक्रेनला ‘घोस्ट ऑफ किव्ह’देखील खरा नसल्याचे मान्य करणे भाग पडले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये रशियाविरोधातील लढाईत युक्रेनने केलेल्या सर्वच दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘घोस्ट ऑफ किव्ह'

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक लष्करी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान रशियाने युक्रेनची राजधानी किव्हच्या सीमेपर्यंत धडक मारण्यात यश मिळविले होते. या लढाईदरम्यान युक्रेनची संरक्षणदले रशियाला जोरदार प्रतिकार करीत असल्याचे व रशियाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दावे वारंवार प्रसिद्ध केले जात होते. पाश्चिमात्य माध्यमांनी हे दावे उचलून धरीत रशियाविरोधात आक्रमक प्रचारयुद्ध छेडले होते. रशियाने यातील काही दाव्यांमधील खोटेपणा समोर आणला होता. मात्र तरीही युक्रेन व युक्रेनच्या पाठीशी असणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी प्रचारयुद्धात आघाडी घेतल्याचे चित्र उभे राहिले होते.

‘घोस्ट ऑफ किव्ह'

‘घोस्ट ऑफ किव्ह’ यापैकीच एक आहे. राजधानी किव्हनजिक तैनात असणारा युक्रेनचा एक वैमानिक रशियन विमानांना बेधडक लक्ष्य करून ती उडवून देत असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता. एकाच वैमानिकाने शौर्य दाखवून रशियन हवाईदलाची 40 लढाऊ विमाने उडवून दिल्याचे छातीठोकपणे सांगण्यात येत होते. युक्रेनच्या संरक्षणदलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी मोहीमही राबविली होती. या माध्यमातून आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करीत असलेली रशिया कमकुवत असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. मात्र आता त्याला तडा गेल्याचे युक्रेनी हवाईदलाने दिलेल्या कबुलीवरून दिसून येते.

यापूर्वीही सोशल मीडियावर युक्रेन सरकार, संरक्षणदले व माध्यमांनी दाखविलेल्या गोष्टी खोट्या असल्याचे वारंवार उघड झाले होते. मात्र तरीही पाश्चिमात्य माध्यमे युक्रेनच्या पाठीशी असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले नव्हते. पण आता ‘घोस्ट ऑफ किव्ह’ ही दंतकथा असल्याचे युक्रेनकडूनच सांगण्यात आल्याने युक्रेनच्या इतर दाव्यांवरही प्रश्नचिन्हे उभी राहू शकतात.

दरम्यान, खार्किव्हनजिक रशिया व युक्रेनदरम्यान चालू असलेल्या घनघोर संघर्षात रशियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल व्हॅलरी गेरासिमोव्ह जखमी झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. गेरासिमोव्ह यांना रशियातील बेलगोरोदमध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी युक्रेनने युद्धादरम्यान रशियन संरक्षणदलातील 10 आघाडीच्या अधिकाऱ्यांना मारल्याचेही दावे केले आहेत. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु आजारी असल्याचा दावाही यापूर्वी करण्यात आला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info