मॉस्को/किव्ह/वॉशिंग्टन – रशियाची युक्रेनवरील लष्करी कारवाई यशस्वी ठरली, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जाहीर केले. कुठल्याही परिस्थितीत आपल्या विरोधात स्प्रिंगबोर्ड म्हणून युक्रेनचा वापर होऊ न देण्याचे उद्दिष्ट रशियाने समोर ठेवले होते आणि ते सफल झाले, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. त्याचवेळी पाश्चिमात्य अजूनही युक्रेनमधील संघर्ष भडकावित असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. तर व्हर्च्युअल माध्यमातून अमेरिकन संसदेला संबोधित करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या क्षणी युक्रेनला अमेरिकेची गरज असल्याचे सांगून आपल्या मागण्यांची यादी अमेरिकेसमोर ठेवली आहे.
रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याचे व्हिडिओज् बुधवारी समोर आले होते. युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता कायम ठेवूनही, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ही लष्करी मोहीम सफल झाल्याची घोषणा केली. त्याचवेळी या युद्धाला रशिया नाही, तर युक्रेनचा रशियाच्या विरोधात वापर करू पाहणारे पाश्चिमात्य देश जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. युक्रेनमधील युद्ध आता पाश्चिमात्य देशच भडकवत आहेत. रशियामध्ये नागरी संघर्ष पेटवण्यासाठीही पाश्चिमात्यांची कारस्थाने सुरू आहेत. पण पाश्चिमात्यांनी अजूनही रशियाला ओळखलेले नाही. या सार्या संघर्षामुळे रशिया अधिकच बलशाली बनेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला.
युक्रेन ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा नाही. पण पुढच्या काळात युक्रेनकडे अण्वस्त्रे येऊ शकतात. अशा परिस्थितीत युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याखेरीज रशियासमोर पर्यायच नव्हता, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. पाश्चिमात्यांना सामर्थ्यशाली व सार्वभौम रशिया पहायचा नाही. त्यासाठीच रशियाच्या विरोधात या सार्या हालचाली सुरू असल्याचा ठपका रशियन राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. दरम्यान, लष्करी मोहीम सफल झाल्याचे जाहीर करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमधून माघार घेण्याची तयारी केली आहे का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अमेरिकन कॉंग्रेससमोर व्हर्च्युअल माध्यमातून बोलताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका स्वीकारली.
युक्रेन नाटोचा सदस्य बनू शकणार नाही, असे सांगून रशियाबरोबर तडजोडीच्या दिशेने पावले टाकणार्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बुधवारी निराळा पवित्रा स्वीकारला. अमेरिकेवर झालेल्या पर्ल हार्बर, ९/११ हल्ल्याचा दाखला देऊन युक्रेन दररोज अशा हल्ल्यांचा सामना करीत असल्याचे झेलेन्स्की म्हणाले. आम्हाला या क्षणी तुमच्या सहाय्याची गरज आहे. अमेरिकेने युक्रेनमधील मृत्यूचे थैमान रोखण्यासाठी लष्करी सहाय्य करावे, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. याबरोबरच अमेरिकेने युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करावा, अशी मागणी झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा केली आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची ही नो फ्लाय झोनची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. कारण त्यामुळे तिसर्या महायुद्धाचा भडका उडेल, अशी भीती अमेरिकेतीलच काहीजणांनी व्यक्त केली आहे. पण युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महत्त्वपूर्ण घोषणा करतील, असे सांगितले जाते. याने युक्रेनचे युद्ध अधिकच तीव्र होईल, असे संकेत मिळत आहेत.