युक्रेनसारखे युद्ध छेडता येणार नाही इतके रशियाला कमकुवत करायचे आहे

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

किव्ह/मॉस्को – युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविणाऱ्या तसेच रशियावर कठोर निर्बंध लादून त्याची कोंडी करणाऱ्या अमेरिकेचे खरे इरादे समोर आले आहेत. युक्रेनमध्ये केलेल्या युद्धानंतर पुन्हा युद्ध करता येणार नाही इतके रशियाला कमकुवत झालेले पहायचे आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केले आहे. तर युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाची युद्धातील उद्दिष्टे अपयशी ठरली आहेत व युक्रेन जिंकत आहे, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला. ऑस्टिन व ब्लिंकन युक्रेन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनला अतिरिक्त 70 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याचीही घोषणा केली.

रशियाला कमकुवत

गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा जाहीर केला होता. या टप्प्यात पूर्व व दक्षिण युक्रेनवर नियंत्रण मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रशियन संरक्षणदलांनी खार्किव्हपासून ओडेसा शहरापर्यंतच्या क्षेत्रात आक्रमक आघाडीही उघडली आहे. त्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचवेळी रशिया व युक्रेनमधील शांतीचर्चाही सध्या अधांतरी स्थितीत आहे. अशा स्थितीत अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला अधिकाधिक शस्त्रपुरवठा सुरू केला असून रशियाविरोधातील संघर्ष सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्याची ग्वाहीदेखील वारंवार दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनला दिलेली भेट व त्यात केलेली उघड वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरत आहेत. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची राजवट उलथण्याबाबत तसेच त्यांना युद्धगुन्हेगार ठरविण्यासंदर्भात वक्तव्ये केली होती. मात्र अमेरिकी प्रशासनाकडून त्यावर तात्काळ खुलासे देण्यात आले होते. पण संरक्षणमंत्री ऑस्टिन तसेच परराष्ट्रमंत्री ब्लिंकन हे जबाबदार वक्तव्ये करणारे अधिकारी म्हणून ओळखण्यात येतात. त्यामुळे त्यांची वक्तव्ये अमेरिकेचे खरे धोरण व इरादे दाखविणारी असल्याचे मानण्यात येते.

रशियाला कमकुवत

‘युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाने ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्याची पुनरावृत्ती रशिया करु शकणार नाही इतका तो कमकुवत झालेला अमेरिकेला पहायचा आहे’, असे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन म्हणाले. त्याचवेळी युक्रेनला योग्य शस्त्रास्त्रे व यंत्रणा मिळाल्या तर युक्रेन युद्ध जिंकू शकतो, असा दावाही त्यांनी केला. ‘रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धात जी काही उद्दिष्टे ठेवली होती, ती पूर्ण करण्यात रशिया अपयशी ठरला आहे. युक्रेन जिंकला आहे’, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कीबरोबर झालेल्या चर्चेत अमेरिकेने 70 कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणसहाय्याचीही घोषणा केली.

दरम्यान, रशियाने मारिपोलमधील स्टील फॅक्टरीतून नागरिकांच्या सुटकेसाठी ‘कॉरिडॉर’ उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर केले आहे. सोमवारी हा कॉरिडॉर खुला केला जाईल, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने केलेली घोषणा युक्रेनने नाकारली असून असा कोणताही करार झाला नसल्याचे म्हटले आहे. उलट मारिपोलमधील स्टील फॅक्टरीत शांतीचर्चेची फेरी आयोजित करावी, असा प्रस्ताव युक्रेनने दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info