किव्हजवळील हत्याकांडावरून युक्रेन व रशियाचे परस्परांवर गंभीर आरोप

किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हजवळील भागातून माघार घेण्याआधी रशियन सैनिकांनी इथे हत्याकांड घडविल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात मृतदेह आढळले असून त्यांची छळवणूक झाल्याचेही समोर येत आहे. युक्रेनसह युरोपिय देशांनी यासाठी रशियाला धारेवर धरले असून रशियावर युद्धगुन्हेगारीचे आरोप ठेवले आहे. मात्र रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी हे आरोप म्हणजे रशियाविरोधी अपप्रचाराचा भाग असल्याचे सांगून त्याचे खंडन केले आहे.

किव्हजवळील

राजधानी किव्हजवळील बुचामधून रशियन सैनिकांनी माघार घेतली. मात्र या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मृतदेह सापडले आहेत. रशियन सैनिकांनी माघार घेताना इथे सर्वसामान्य नागरिकांचे हत्याकांड घडविले. काहीजणांचा छळ करून त्यांना रशियन सैनिकांनी ठार केल्याचे पुरावे आढळत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. हा वंशसंहाराचा गुन्हा ठरतो, असे सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यासाठी रशियावर सडकून टीका केली आहे. जर्मनी व फ्रान्स या देशांनीही यासाठी रशियावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

मात्र रशियाने हे सारे आरोप धुडकावले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी रशियन सैन्याने १ मार्च रोजीच किव्हजवळून माघार घेतली होती, याची आठवण करून दिली. इतकेच नाही तर २ मार्च रोजी इथे सारे काही नीट असल्याचा निर्वाळा किव्हच्या महापौरांनी दिला होता, याकडेही रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर इथे जे काही झाले, त्यासाठी रशियाला जबाबदार धरता येऊ शकत नाही, असे सांगून हा रशियाविरोधी अपप्रचाराचा भाग असलाचा ठपका सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी ठेवला.

यासंदर्भात रशिया संयुक्त राष्ट्रसंघाच्या संपर्कात आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतही रशिया हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी दिली. तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुचामधील मृतदेहांचे व्हिडिओज् आणि फोटोग्राफ्स हा पाश्‍चिमात्य माध्यमांना दाखविण्यासाठी युक्रेनच्या सरकारने केलेला बनाव असल्याची घणाघाती टीका केली.

दरम्यान, रशिया आता युक्रेनच्या युद्धातून माघारीची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनच्या युद्धात रशियाला गुंतवून ठेवण्याच्या योजनेवर अमेरिका काम करीत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र रशियाने युक्रेनमधील लष्करी कारवाईचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे जाहीर करून इथून माघार घेण्याची योजना कार्यान्वित केली आहे. युक्रेनच्या शहरांमध्ये घुसून ही शहरे ताब्यात घेण्याची रशियाची योजना नाही, असे याआधीच रशियन नेत्यांनी जाहीर केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, युक्रेनमधून येत असलेल्या बातम्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सातत्याने रशियावर आगपाखड करणार्‍या पाश्‍चिमात्य माध्यमांनी बुचामधील मृतदेहांचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र रशिया या प्रचारमोहिमेच्या विरोधात आक्रमक बनला असून रशियाने यासंदर्भात स्वीकारलेल्या भूमिका आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील एका गटाकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसू लागले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info