पूर्व युक्रेन व मारिपोलसह युक्रेनच्या इंधनतळांवर रशियाचे तीव्र हल्ले

पूर्व युक्रेन

मॉस्को/किव्ह – राजधानी किव्हजवळ झालेल्या हत्याकांडावरून पाश्‍चिमात्य देश आक्रमक होत असतानाच रशियाने आपले युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतातील पाच शहरांवर तोफा, रॉकेट्स व मॉर्टर्सचा मारा सुरू असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी स्थानिक युक्रेनी गव्हर्नर्स करीत आहेत. मारिपोल शहरावरही सातत्याने हल्ले सुरू असून लिव्ह व डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतातील इंधनतळांनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली.

युक्रेनची राजधानी किव्हजवळील बुचा भागात रशियन फौजांनी निर्घृण हत्याकांड घडविल्याचा आरोप पाश्‍चिमात्य देश करीत आहेत. यासाठी रशियाविरोधात जबर व व्यापक कारवाई करण्याची तयारीही पाश्‍चिमात्य देशांनी केली आहे. बुधवारी युरोपिय महासंघ तसेच नाटोची बैठक असून या बैठकीत रशियाविरोधात अधिक कठोर निर्बंधांची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी युरोपिय देशांनी रशियाविरोधात राजनैतिक पातळीवर हालचाली सुरू केल्या असून १५०हून अधिक रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अमेरिकेसह काही देश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर युद्धगुन्हेगारीचा खटला दाखल करावा म्हणून आग्रही भूमिका घेत आहेत.

पूर्व युक्रेन

मात्र पाश्‍चिमात्यांच्या या दबावासमोर न झुकता रशियाने युक्रेनमधील आपल्या कारवाईची तीव्रता अधिकच वाढविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रशियन फौजांनी पूर्व युक्रेन व मारिपोलवर आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसतेे. पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतातील काही भाग रशियासमर्थक गटांच्या ताब्यात आहे. मात्र आता रशियाने या प्रांतांवर पूर्णपणे ताबा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. युक्रेन तसेच पाश्‍चिमात्य देशांमधील विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. सोमवारपासून रशियन फौजांनी लुहान्स्क प्रांतातील शहरांमध्ये तोफांसह मॉर्टर्स, रॉकेट्स तसेच क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे.

पूर्व युक्रेन

लुहान्स्क प्रांतातील सेव्हेरोडोनेत्स्क, लिसिचॅन्स्क, क्रेमिना, रुबिझ्ने, पोपास्ना व हिर्स्क या शहरांमध्ये रशियन फौजांचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. या शहरांमध्ये नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची गरज असल्याची मागणी लुहान्स्कचे मिलिटरी गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी केली आहे. या भागात रशियन फौजा संघर्षबंदीच्या स्थितीत नसल्याचा दावाही त्यांनी केला. रुबिझ्ने शहराचा जवळपास ६० टक्के भाग रशियन फौजांच्या ताब्यात गेल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पूर्व युक्रेनबरोबरच मारिपोल शहरातील हल्लेही सुरू असून या भागात एक लाखांहून अधिक नागरिक अडकून पडल्याचे समोर आले आहे.

रशियाने बुधवारी सकाळी लिव्ह, व्हिनित्सिआ, डिनिप्रोपेट्रोव्हस्क व खार्किव्हमध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले आहेत. लिव्ह, व्हिनित्सिआ, डिनिप्रोपेट्रोव्हस्कमध्ये युक्रेनी लष्कराच्या पाच इंधनतळांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली. मंगळवारी रात्रीपासून खार्किव्हमध्ये रॉकेट्स व क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले चढविण्यात आले आहेत. तर मायकोलिव शहरात करण्यात आलेल्या रशियन हल्ल्यांमध्ये ५५ जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनी अधिकार्‍यांनी दिली आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info