पूर्व युक्रेनमधील क्रामाटोर्स्कवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ५० जणांचा बळी

- हल्ल्यावरून रशिया व युक्रेनचे एकमेकांवर आरोप

क्षेपणास्त्र हल्ल्यात ५० जणांचा बळी

मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क प्रांतात असलेल्या क्रामाटोर्स्क रेल्वेस्थानकावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ५० जणांचा बळी गेला असून १००हून अधिक जखमी झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात युक्रेनने ‘टॉच्का-यु’ क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा आरोप रशियाने केला आहे. मात्र युक्रेन व पाश्‍चिमात्य देशांनी सदर हल्ला रशियाने केल्याचा दावा केला असून त्याविरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. रशियाच्या संरक्षणविभागाने हल्ल्याचे वृत्त स्पष्ट शब्दात फेटाळले असून ही घटना चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसात रशियाने पूर्व युक्रेनमधील कारवाईवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली होती. पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतांवर पूर्ण ताबा मिळविण्याची योजना रशियाने आखल्याचा दावा युक्रेन तसेच पाश्‍चिमात्य देशांमधील विश्‍लेषकांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी झालेला भीषण हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. पूर्व युक्रेनमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सुमारे चार हजार नागरिक रेल्वेस्थानकावर एकत्र आले होते.

क्षेपणास्त्र हल्ल्यात ५० जणांचा बळी

या नागरिकांसाठी गाडी येण्यापूर्वीच दोन क्षेपणास्त्रे रेल्वेस्थानक व परिसरात डागण्यात आली. हल्ला झाल्यानंतर काही मिनिटातच युक्रेनच्या अधिकार्‍यांनी सदर हल्ला रशियाने चढविल्याचा दावा केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही रशियावर टीकास्त्र सोडून हा देश सैतानी देश असून त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असा ठपका ठेवला. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या क्षेपणास्त्रावर रशियन भाषेत ‘फॉर चिल्ड्रेन’ असे लिहिण्यात आल्याचे फोटोग्राफ्सही युक्रेनियन यंत्रणांनी प्रसिद्ध केले आहेत.

क्षेपणास्त्र हल्ल्यात ५० जणांचा बळी

रेल्वेस्थानकावरील हल्ल्यासाठी ‘टॉच्का-यु’ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. गेल्या शतकात रशियाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्रांचा वापर रशिया व युक्रेन हे दोन्ही देश करतात. यापूर्वी मार्च महिन्यात डोनेत्स्कमध्ये झालेल्या एका हल्ल्यातही या क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचा दावा रशियाने केला होता. शुक्रवारी क्रामाटोर्स्क रेल्वेस्थानकावर झालेल्या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे आरोप संरक्षण विभागाने फेटाळले आहेत. शुक्रवारी रशियन फौजांनी क्रामाटोर्स्क भागात कोणतीही लष्करी कारवाई केली नसल्याचे रशियन प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र युक्रेन व पाश्‍चिमात्य देशांनी रशियावरील आरोप सुरू ठेवले असून शुक्रवारचा हल्ला रशियन अत्याचारांचे ठळक उदाहरण असल्याचा ठपका ठेवला आहे.

दरम्यान, पूर्व युक्रेनमध्ये सुरू झालेला संघर्ष हा दुसर्‍या महायुद्धाची आठवण करून देणारा ठरेल, असे वक्तव्य युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रि कुलेबा यांनी केले आहे. या संघर्षात मोठ्या प्रमाणावर रणगाडे, तोफा, सशस्त्र वाहने व लढाऊ विमानांचा वापर होईल आणि रशियाने या संघर्षासाठी योजना आखली आहे, असा दावाही युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info