युक्रेन व शेजारी देशांमध्ये अमेरिका, नाटोच्या लष्करी हालचाली तीव्र

लंडन/वॉशिंग्टन/ब्रातिस्लावा – अमेरिका, ब्रिटन व नाटो सदस्य देशांनी युक्रेन आणि शेजारी देशांमधील आपली तैनाती वाढविली आहे. युक्रेनच्या लष्कराला प्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज केले जाईल, अशी घोषणा ब्रिटनने केली. तर अमेरिकेच्या सूचनेनंतर स्लोव्हाकियाने युक्रेनसाठी ‘एस-३००’ ही रशियन बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा रवाना केली आहे. याच्या बदल्यात अमेरिका स्लोव्हाकियामध्ये पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे युक्रेनचे युद्ध संपण्याची शक्यता मावळत चालल्याचे दिसत आहे.

युक्रेन व शेजारी

बुचा येथील नरसंहार आणि काही तासांपूर्वी क्रामाटोर्स्कवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी रशिया जबाबदार असल्याचा ठपका युक्रेनसह अमेरिका, नाटो व युरोपिय देश करीत आहेत. युक्रेननेच क्रामाटोर्स्कवर हल्ला चढवून आपल्यावर याचे खापर फोडल्याचा आरोप रशिया करीत आहे. तसेच बुचा येथील नरंसहाराचे आरोपही रशियाने फेटाळले आहेत. पण पाश्‍चिमात्य देश बुचा येथील नरसंहारासाठी रशियावर युद्धगुन्हे लादले जातील, अशी धमकी देऊन युक्रेनला नव्याने शस्त्रसज्ज करीत आहेत. तसेच युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जमवाजमव वाढवित आहेत.

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी युक्रेनसाठी आधुनिक व प्रभावी शस्त्रास्त्रे रवाना करीत असल्याची घोषणा नाटोच्या बैठकीत केली. युक्रेनकडील शस्त्रास्त्रे सोव्हिएतकालिन असल्याचे सांगून ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनसाठी शस्त्रसाठा रवाना करण्याचे स्पष्ट केले. ब्रिटन युक्रेनला कोणती शस्त्रास्त्रे देणार असल्याचे स्पष्ट झालेले नाही. पण या युद्धात ब्रिटनने युक्रेनच्या लष्करासाठी विशेष आर्थिक सहाय्य जाहीर केले होते. त्याचबरोबर वैद्यकीय सहाय्य पुरविले होते.

नाटोच्या बैठकीत ब्रिटनने ही घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्लोव्हाकियात पॅट्रियॉट ही अमेरिकन बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याची घोषणा केली. यासाठी स्लोव्हाकियाने स्वत:ची ‘एस-३००’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा युक्रेनला पुरवावी, अशी सूचना बायडेन प्रशासनाने केली. त्यानुसार स्लोव्हाकियाने युक्रेनसाठी एस-३०० रवाना केली आहे.

युक्रेनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविली असली आणि अमेरिकेची पॅट्रियॉट तैनात करण्याची तयारी केली असली तरी, स्लोव्हाकिया युक्रेनच्या युद्धात सहभागी होणार नसल्याचे या देशाचे पंतप्रधान एड्युअर्ड हेगर यांनी स्पष्ट केले. तर अमेरिका युक्रेनसाठी जॅवलिन आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे रवाना करणार असल्याचा दावा केला जातो. दरम्यान, युक्रेनमधील युद्ध तीव्र होणार असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नागरिकांना पूर्व युक्रेनमधून पळ काढण्याचे आदेश दिले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info