इंडो-पॅसिफिकमध्ये चीनमुळे अस्थैर्य माजल्याचा अमेरिका-जपानचा आरोप

इंडो-पॅसिफिकमध्ये चीनमुळे अस्थैर्य माजल्याचा अमेरिका-जपानचा आरोप

टोकिओ – ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या व अस्थैर्य माजविणार्‍या आहेत. या कारवायांद्वारे चीन सदर क्षेत्रातील देशांना व आंतरराष्ट्रीय समुदायाला राजकीय, आर्थिक, लष्करी स्तरावर आव्हान देत आहे’, यावर अमेरिका व जपानचे एकमत झाले आहे. अमेरिका आणि जपानच्या परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये मंगळवारी ‘टू प्लस टू’ स्तरावरील बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात चीनवर हल्ला चढविला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन हे मंगळवारी जपानमध्ये दाखल झाले आहेत. बायडेन प्रशासनातील नेत्यांचा हा पहिला परदेश दौरा ठरतो. या निमित्ताने अँथनी आणि ऑस्टिन यांनी जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि संरक्षणमंत्री नोबूओ किशी यांची भेट घेतली. जपानबरोबरचे सहकार्य अधोरेखित करण्यासाठी ‘टू प्लस टू’ स्तरावरील आपली बैठक बेतलेली असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी जपानमध्ये दाखल होताच स्पष्ट केले होते.

दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया अस्थैर्य माजविणार्‍या असल्याची टीका करण्यात आली. चीन या क्षेत्रात अव्यवस्था निर्माण करीत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या चीनच्या बळजबरीच्या कारवायांना अमेरिका व जपान कायम विरोध करील, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर सेंकाकू द्विपसमुहावरील जपानच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, चीनने तटरक्षक दलाला दिलेल्या अधिकारांवरही यावेळी टीका करण्यात आली. गेल्या महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘ईस्ट व साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात दाखल होणार्‍या परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याचे अधिकार आपल्या तटरक्षदक दलाला दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करून चीन आपल्या शेजारी देशांच्या जहाजांवर हल्ले चढवू शकतो, अशी चिंता जपानसह तैवान व आग्नेय आशियाई देश व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, टू प्लस टूच्या बैठकीच्या निमित्ताने अमेरिका व जपानने चीनच्या या नियमांवर ताशेरे ओढून या क्षेत्रातील देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका व जपान वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info