मॉस्को/स्ट्रासबर्ग – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांविरोधात नव्या निर्बंधांची घोषणा केली. या घोषणेनुसार, युक्रेनला सहाय्य करणाऱ्या देशांना करण्यात येणारी उत्पादनांची तसेच कच्च्या मालाची निर्यात थांबविण्यात येणार आहे. तसेच पाश्चिमात्य देशांबरोबर केलेले करार रद्द करण्याचा इशाराही पुतिन यांनी दिला. पुतिन यांच्या इशाऱ्यानंतर युरोपिय महासंघाकडूनही नव्या निर्बंधांचे संकेत देण्यात आले. यात रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात थांबविण्याचा प्रस्ताव आहे.
रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धानंतर अमेरिका व युरोपसह मित्रदेशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंधांचा मारा केला होता. रशियन अर्थव्यवस्थेवर या निर्बंधांचा परिणाम झाला असला तरी रशियाच्या युक्रेनवरील मोहिमेवर फारसा फरक पडलेला नाही. उलट रशियाने गेल्याच महिन्यात युक्रेनवरील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करून अधिक आक्रमक हल्ले सुरू केले आहेत. दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलंड व बल्गेरियासारख्या देशांचा इंधनपुरवठा रोखणे, रुबल चलनातील व्यवहारांवर भर देणे, रशियाकडून निर्यात होणाऱ्या उत्पादनांसंदर्भातील नियमांमध्ये बदल करणे यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अधिक आग्रही भूमिका घेऊन पाश्चिमात्य देशांना कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. मंगळवारी पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा त्याचाच भाग ठरतो.
या कायद्यानुसार, रशियाकडून प्राधान्याने निर्यात होणारा कच्चा माल व उत्पादने यांच्यावर निर्बंध लादले जातील. त्याचवेळी रशियाने केलेले करारही रद्द करण्यात येतील. या गोष्टी युक्रेनला सहकार्य करणाऱ्या पाश्चिमात्य देशांसाठी तसेच कंपन्यांसाठी लागू असणार आहेत. त्याची यादी पुढील काही दिवसात जाहीर होईल, असे रशियन सूत्रांनी सांगितले. रशियन नागरिक तसेच कंपन्यांनी निर्बंध लादलेले देश, कंपन्या व व्यक्तींबरोबर व्यवहार करु नये, असेही नव्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.
रशियाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघाने रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी लादण्याचा प्रस्ताव सादर केला. युरोपिय कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी याची माहिती दिली. या प्रस्तावानुसार, पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने रशियन तेलाची आयात बंद करण्यात येईल. पेट्रोलियम उत्पादनांची आयात बंद करण्यास वर्षअखेरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
हंगेरी व स्लोव्हाकिया यासारख्या देशांना यातून वगळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या दोन्ही देशांनी रशियावरील इंधनविषयक निर्बंधांना कडाडून विरोध केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. युरोपिय महासंघ सध्या रशियाकडून दरवर्षी 100 कोटी बॅरल्सहून अधिक कच्चे तेल आयात करतो. युरोपच्या मागणीपैकी 25 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल रशियाकडून आयात करण्यात येते. 2021 साली युरोपिय महासंघाला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रशियाला तब्बल 73 अब्ज युरोहून अधिक किंमत मोजणे भाग पडले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |