नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र व ड्रोन्सचे हल्ले

- 20 क्रूझ मिसाईल्स व 45 ड्रोन्स डागल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता नव्या वर्षातही कमी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नवीन वर्षाला सुरुवात होत असतानाच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र व ड्रोन्सच्या सहाय्याने मोठा हल्ला चढविला. राजधानी किव्ह, मायकोलेव्ह, झायटोमिर या भागांमध्ये हे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात, देशाच्या सुरक्षेसाठी युक्रेनवर हल्ले चढविणे भाग पडल्याचे सांगून युक्रेनविरोधातील लष्करी मोहिमेचे समर्थन केले.

युक्रेनवर क्षेपणास्त्र

गेल्याच आठवड्यात रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला चढविला होता. बुधवारी व गुरुवारी झालेल्या हल्ल्यात रशियाच्या संरक्षणदलांनी युक्रेनवर तब्बल 120 क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वर्षाव केला होता. यात राजधानी किव्हसह युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या अवधीत रशियाने पुन्हा क्षेपणास्त्रे व ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ला चढवून आपली आक्रमक क्षमता सिद्ध करून दाखविली आहे.

युक्रेनवर क्षेपणास्त्र

शनिवारी मध्यरात्रीनंतर रशियाने राजधानी किव्हसह इतर भागात क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा मारा सुरू केला. बॉम्बर विमाने तसेच युद्धनौकांवरून क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाने 20 क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. क्षेपणास्त्रांबरोबरच ड्रोन्सच्या सहाय्यानेही हल्ले करण्यात आले. रशियन तसेच इराणी बनावटीच्या 45 ड्रोन्सचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. राजधानी किव्हसह मायकोलेव्ह व झायटोमिरला लक्ष्य करण्यात आले.

युक्रेनवर क्षेपणास्त्र

या क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ल्यांबरोबरच रशियन लष्कराने डोन्बास क्षेत्रातही हल्ले केल्याची माहिती युक्रेनने दिली. बाखमत, लिमन, कुपिआन्स्क व ॲव्हडिव्हकामध्ये रशियन फौजांनी घणाघाती हल्ले केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. यासाठी तोफा, रॉकेट्स व मॉर्टर्सचा वापर करण्यात आला आहे. रशियाच्या या हल्ल्यांमुळे पुढील वर्षातही रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता कायम राहण्याचे संकेत मिळाले आहेत.

रशियाकडून डिसेंबर महिन्यात युक्रेनविरोधातील हल्ल्यांची धार अधिक प्रखर करण्यात आली होती. रशियाने डोन्बास क्षेत्र तसेच खेर्सन शहरावर सातत्याने मारा सुरू केला असून युक्रेनी लष्कराची आगेकूच रोखण्यात यश मिळविले आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनची राजधानी किव्ह व परिसरात सातत्याने क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा मारा करून आपली युद्धक्षमता कायम असल्याचे रशिया दाखवून देत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात, रशिया कधीही पाश्चिमात्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. रशियन संरक्षणदले आपल्या मातृभूमीचा बचाव व जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info