रशियातून युरोपला होणारा इंधनपुरवठा युक्रेनने रोखला

fuel supplies

किव्ह/मॉस्को – रशियाकडून होणाऱ्या जबरदस्त हल्ल्यांचे कारण पुढे करीत युक्रेनने युरोपिय देशांना होणारा इंधनपुरवठा रोखला आहे. युक्रेन-रशिया सीमेवरील डोन्वास भागात असणाऱ्या ‘सोख्रानोव्हका ट्रान्झिट पॉईंट’वरून होणारा इंधनपुरवठा बुधवारपासून थांबविण्यात आला आहे. युरोपिय देशांना होणाऱ्या नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा अचानक थांबल्याने इंधनाच्या दरांनी पाच टक्क्यांची उसळी घेतली आहे.

इंधनपुरवठारशियाने गेल्या काही दिवसात पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्रातील हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. अनेक शहरे व मोक्याच्या जागांवर रशियाकडून क्षेपणास्त्रे, रॉकेट्स व तोफांचा मारा सुरू आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या खार्किव्हसाठी घनघोर संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूंकडून दररोज नवनवीन दावे करण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी रशियाने पोलंड व बल्गेरिया या दोन देशांना होणारा इंधनपुरवठा पेमेंटच्या मुद्यावरून बंद केला होता. ही बाब वगळता संघर्ष सुरू असतानाही रशियाने युरोपिय देशांना होणाऱ्या इंधनपुरवठ्यात खंड पडू दिलेला नाही. दुसऱ्या बाजूला युक्रेन युरोपिय देशांनी रशियाकडून होणारा इंधनपुरवठा थांबवावा म्हणून सातत्याने मागणी करीत आहे. अमेरिका व ब्रिटनसह इतर मित्रदेशांनीही या मुद्यावरून महासंघावर दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र महासंघातील आघाडीचा देश असलेल्या जर्मनीने स्पष्ट नकार दिल्याने रशियन इंधनपुरवठा सुरळीत चालू आहे.

या पार्श्वभूमीवर युक्रेनने अचानक युरोपला इंधनपुरवठा करणारी पाईपलाईन बंद करण्याचा निर्णय घेणे खळबळ उडविणारे ठरले आहे. ‘सोख्रानोव्हका ट्रान्झिट पॉईंट’वरून युरोपमधील इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लोव्हाकिया यासारख्या देशांना इंधनपुरवठा होतो. दर दिवशी 3.26 कोटी घनमीटर इतका इंधनवायू या पाईपलाईनच्या माध्यमातून पुरविण्यात येतो. युरोपला पुरविण्यात येणाऱ्या एकूण इंधनवायूच्यात तुलनेत हे प्रमाण एक तृतियांश इतके आहे.

युक्रेनच्या कंपनीने रशियाकडून होणारे हल्ले व भविष्यातील अनपेक्षित घटनाक्रमाचे कारण पुढे करून इंधनपुरवठा रोखल्याचे सांगितले आहे. मात्र युरोपला इंधनपुरवठा करणाऱ्या ‘गाझप्रोम’ कंपनीने पुरवठा थांबविण्यासारखी कोणतीच घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी युरोपला पुरविण्यात येणाऱ्या दुसऱ्या इंधनवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पर्यायी पुरवठा करणे शक्य नसल्याचाही खुलासा केला आहे. युक्रेनच्या निर्णयामुळे रशिया व युक्रेनमधील संघर्ष अधिकच भडकू शकतो, अशी शक्यता विश्लेषकांकडून वर्तविण्यात आली आहे. रशियाकडून गेल्या वर्षी युरोपिय देशांना 150 अब्ज घनमीटरहून अधिक इंधनवायूची निर्यात करण्यात आली होती. युरोपच्या एकूण गरजैपैकी 40 टक्क्यांहून अधिक गरज रशियन इंधनवायूच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली होती. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून होणारी ही आयात कमी करण्यासाठी युरोप पावले उचलत असून अमेरिकेसह आफ्रिका तसेच आखाती देशांकडून आयात वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रशियानेही आपल्या इंधनासाठी पर्यायी बाजारपेठ शोधण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. युरोपिय देशांना होणारा इंधनवायुचा पुरवठा रशिया आशियाई देशांकडे वळवू शकतो, असा दावा रशियन विश्लेषकाने नुकताच केला होता.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info