जेरुसलेम/वॉशिंग्टन – अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबर अणुकरार केल्यानंतर जगभरात आण्विक वादळ येईल. सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त आणि युएई देखील अणुबॉम्ब मिळवण्याच्या स्पर्धेत उतरतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला आहे. इराण पाठोपाठ सौदीदेखील अणुबॉम्बने सज्ज होईल, असे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील विश्लेषकांनी बजावले होते. सौदीनेही तसे इशारे दिले होते.
अणुकरार यशस्वी करायचा असेल तर, आत्तापर्यंत इराणवर लादलेले सर्व निर्बंध मागे घ्यावे, तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळावे, अशा शर्ती इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. या मागण्यांवर बायडेन प्रशासनाने कुठलीही घोषणा केलेली नाही. पण अणुकरारासाठी इराणला निर्बंधातून सवलत देण्याचे संकेत, बायडेन प्रशासनाकडून दिले जात आहेत. अमेरिकन काँग्रेसमधील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी याला कडाडून विरोध करीत आहेत. पण हा विरोध डावलून बायडेन प्रशासन इराणबरोबरील अणुकरारावर ठाम आहे. त्यामुळे हा अणुकरार झालाच, तर काय होईल, याची जाणीव अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी बायडेन प्रशासनाला करून देत आहेत.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ना दहशतवाद्यांच्या यादीत ठेवून अमेरिकेला कुठलाही फायदा होणार नाही, असे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी नुकतेच म्हटले होते. ‘पण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे हात अमेरिकन जनतेच्या रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळे रिव्होल्युशनरी गार्ड्सना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्यासाठी बायडेन प्रशासनाने कुठलेही कारण दिले तरी ते पटण्याजोगे नसेल’, असे एली कोहनीम या आखातविषयक विश्लेषकांनी म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सबाबतची मागणी मान्य करूनही बायडेन प्रशासनाने अणुकरार केला, तर त्यामुळे आखातात अण्वस्त्र स्पर्धा भडकेल, असा इशारा कोहनीम यांनी दिला. तर डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरम या अभ्यासगटाचे विश्लेषक अमीर अविवी यांनी याबाबत अधिक गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.
इराण अण्वस्त्रसज्ज बनला, तर यामुळे आखातातील इराणचे प्रतिस्पर्धी देश असुरक्षित बनतील. त्यानंतर सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन आणि युएई या देशांकडूनही अण्वस्त्रसज्जतेसाठी हालचाली सुरू होतील, असा इशारा अविवी यांनी दिला. असे झालेच तर य देशांना स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रसज्ज होऊ नका, असा सल्ला देण्याचा अमेरिका आणि युरोपला कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नसेल, असे अविवी यांनी बजावले. इराण अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होईल, त्या दिवशी सौदी अरेबिया पाकिस्तानकडून अणुबॉम्ब मिळवेल. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला निधी पुरविणाऱ्या सौदीने याची फार आधीच तरतूद केली आहे, असा दावा इस्रायली विश्लेषकांनी केला.
असे घडले तर फक्त आखातातच नाही तर जगभरात अस्थैर्य माजले, जगभरात संघर्ष भडकेल. इस्रायलच्या अस्तित्वाला फार मोठा धोका निर्माण होईल, याची जाणीव अविवी यांनी करून दिली. त्यामुळे इराणबरोबरचा अणुकरार मानवतेसाठी धोकादायक आहे. असे असतानाही युरोपिय महासंघ आणि बायडेन प्रशासन या अणुकरारासाठी का आग्रह धरत आहे, हे समजण्यापलीकडे असल्याची चिंता अविवी यांनी व्यक्त केली. बायडेन प्रशासन ज्यांच्याशी अणुकरार करण्यासाठी एवढे आग्रही आहेत, त्या इराणने अमेरिकेला ‘मोठा सैतान’ आणि इस्रायलला ‘छोटा सैतान’ म्हटले होते, याची आठवण अविवी यांनी करून दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |