युक्रेनला डोन्बासमधून माघार घेणे भाग पडेल

- युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली

डोन्बासमधून माघार

मॉस्को/किव्ह – गेल्या आठवड्याभरात डोन्बासमधील महत्त्वाची शहरे व मोठा भाग गमावणाऱ्या युक्रेनी फौजांना डोन्बासमधून माघार घेणे भाग पडेल, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. डोन्बासचा भाग असलेल्या लुहान्स्कमधील युक्रेनी गव्हर्नरने रशियन फौजा सेव्हेरोडोनेत्स्कमध्ये शिरल्याची कबुली दिली आहे. एकीकडे डोन्बावरील हल्ले तीव्र करीत असतानाच रशियाने ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करीत युक्रेन व पाश्चिमात्य देशांना नवा इशारा दिला आहे. तर अमेरिकेने युक्रेनला ‘गायडेड मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम’ देण्यास मान्यता दिल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.

डोन्बासमधून माघार

शुक्रवारी रशियाने डोन्बासमधील लिमन या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरावर ताबा मिळविला होता. हे शहर डोन्बासमधील मोक्याच्या जागांना जोडणाऱ्या ‘ईस्ट-वेस्ट रोड’चा भाग आहे. युक्रेनी लष्करासाठी महत्त्वाचे ‘ट्रान्सपोर्ट व सप्लाय हब’ असणाऱ्या ‘स्लोव्हियान्स्क’पासून लिमन अवघ्या 20 किलोमीटरवर आहे. त्याचवेळी या शहरातून बाखमत व सेव्हेरोडोनेत्स्क या दोन्ही शहरांना लक्ष्य करता येऊ शकते. यामुळ लिमन रशियाच्या नियंत्रणाखाली आल्यावर रशिया लुहान्स्क प्रांतावर सहज ताबा मिळवून पुढे उत्तर युक्रेनवरही हल्ले करू शकेल, असा दावा केला जातो.

डोन्बासमधून माघार

लिमनच्या ताब्यानंतर रशियाने डोन्बासच्या इतर भागांमधील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनी लष्कराच्या 600हून अधिक जागा व लष्करी यंत्रणांवर हल्ले चढविल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. यात 40हून अधिक आर्टिलरी युनिट्स व 57 कमांड पोस्टस्‌‍चा समावेश आहे. लुहान्स्कवरील ताब्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्क या शहरात रशियन फौजांनी प्रवेश केला आहे. शहराच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे हॉटेल रशियन फौजांनी ताब्यात घेतले आहे.

डोन्बासमधून माघार

लुहान्स्कमधील युक्रेनी गव्हर्नरनी याची कबुली दिली आहे. त्याचवेळी युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाच्या लुहान्स्क व इतर भागांमधील हल्ल्यांची तीव्रता पाहता युक्रेनी फौजांना डोन्बासमधून माघार घ्यावी लागेल, असा दावा केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच युक्रेनी अधिकाऱ्यांकडून अशा स्वरुपाची वक्तव्ये समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, वरिष्ठ नेते तसेच पाश्चिमात्य देश युक्रेनच्या विजयाची खात्री देत असले तरी डोन्बास क्षेत्र युक्रेनला गमवावे लागेल, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. डोन्बास गमावल्यास युक्रेन व त्याच्या पाश्चिमात्य पाठिराख्यांसाठी तो जबर धक्का असेल, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

दरम्यान, डोन्बासवरील कारवाई तीव्र करीत असतानाच रशियाने ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे. ‘बॅरेन्ट्स सी’मध्ये तैनात असणाऱ्या रशियन विनाशिकेवरून ही चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान झिरकॉनने सुमारे एक हजार किलोमीटर्सवरील लक्ष्य भेदल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाने मोठ्या प्रमाणावर हायपरसोनिक तसेच ‘प्रिसिजन मिसाईल्स’चा वापर केला असून त्याला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर झिरकॉनची चाचणी घेऊन रशियाने युक्रेन व युक्रेनला संरक्षणसहाय्य पुरविणाऱ्या पाश्चिमात्य देशांना योग्य संदेश दिल्याचे सांगण्यात येते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info