युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची बायडेन प्रशासनाची घोषणा

- रशियाकडून गंभीर दखल

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियावर मारा करू शकणारी शस्त्रास्त्रे युक्रेनला पुरविणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले होते. त्याला एक दिवस उलटत नाही तोच, बायडेन प्रशासनाने युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. सुमारे 70 कोटी डॉलर्सच्या या शस्त्रांमध्ये जॅवलिन या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश असून, लष्करी वाहने आणि हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कितीही दावे केले, तरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की या शस्त्रांचा वापर रशियाच्या विरोधात करणार नाहीत, यावर आमचा विश्वास नसल्याची प्रतिक्रिया रशियाच्या ‘क्रेमलिन’ने दिली आहे.

शस्त्रास्त्रे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाच्या भूभागावर हल्ले चढविण्यासाठी अमेरिका युक्रेनला प्रोत्साहन देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. एका अमेरिकन दैनिकात आपली भूमिका मांडणारा लेख राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी प्रसिद्ध केला होता. रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली होती. अन्यथा आपल्या शहरांवर हल्ले चढविण्याचे कारस्थान जिथे शिजले असते, ती ठिकाणे नष्ट करण्याचा निर्णय रशियाने घेतला असता. ही ठिकाणे युक्रेनची राजधानी किव्हबाहेर आहेत, असे मार्मिक उद्गार मेदवेदेव यांनी काढले होते.

मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर, त्यांच्या प्रशासनाने युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याचे तपशील जाहीर केले. यामध्ये हेलिकॉप्टर्स, रणगाडाभेदी जॅवलिन क्षेपणास्त्रे, लष्करी वाहने आणि संरक्षणसाहित्याच्या सुट्ट्या भागांचा उल्लेख आहे. अमेरिकेकडून मिळणारी शस्त्रास्त्रे युक्रेन रशियाच्या भूभागावर हल्ले चढविण्यासाठी वापरणार नाही. आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतेच जाहीर केले होते. पण रशिया त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर अजिबात विश्वासठेवता येणार नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.

यामुळे रशिया अमेरिकेकडून युक्रेनला पुरविल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांकडे अत्यंत गंभीरपणे पाहत असल्याचे दिसते. अमेरिकेपाठोपाठ जर्मनीने देखील युक्रेनला विमानभेदी क्षेपणास्त्र प्रणाली पुरविण्याची घोषणा केली आहे. याचीही रशियाने गंभीर दखल घेतली आहे. नाटोच्या या कारवाया तिसरे महायुद्ध सुरू करणाऱ्या असल्याचे रशियन वृत्तवाहिन्या सांगत आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून मिळत असलेल्या शस्त्रास्त्रांमुळे रशियाची अमेरिकेशी थेट लष्करी टक्कर होण्याचा धोका बळावेल, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. याआधीही रशियाने यावरून अमेरिकेला बजावले होते.

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये मुसंडी मारली असून मारिओपोलनंतर युक्रेनचे सेव्हेरोडोनेत्स्क शहर देखील रशियन सैन्याच्या टाचेखाली येत असल्याचे दिसत आहे. इतर शहरांचाही रशिया ताबा घेण्याची तयारी करीत असताना, युक्रेनला तातडीने शस्त्रपुरवठा करण्याची आवश्यकता अमेरिका व नाटोच्या इतर सदस्यदेशांना वाटू लागली आहे. मात्र रशियन सैन्याला थोपविण्याच्या नादात युक्रेनच्या लष्कराने रशियन सीमाभागाच्या आत हल्ले चढविले, तर आपले प्रत्युत्तर मर्यादित नसेल, असा संदेश रशिया देत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info