योग्य वेळी हिजबुल्लाह इस्रायलची कोंडी करील – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांची धमकी

तेहरान/बैरूत – ‘आज हिजबुल्लाह इस्रायलच्या प्रत्येक डावपेचांविरोधात ठामपणे उभी आहे. योग्य वेळ येईल तेव्हा हिजबुल्लाह इस्रायलची कोंडी करील’, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल हुसेन सलामी यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी सिरियातील हवाई हल्ल्यांमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि हिजबुल्लाहचे वरिष्ठ कमांडर्स ठार झाले. यामुळे संतापलेल्या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी इस्रायलला धमकावले आहे.

इस्रायलची कोंडी

गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियाच्या अलेप्पो, होम्स भागात तीन वेळा हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरिया करीत आहे. इस्रायलच्या या कारवाईत सिरियातील इराणचे लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटना व स्थानिकांनी केला होता. सिरियन माध्यमांनी केलेल्या या दाव्यावर इस्रायलच्या लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलच्या रेडिओवाहिनीने दिलेल्या माहिती सिरियातील या हवाईहल्ल्यात इराण आणि हिजबुल्लाहला जीवितहानी सोसावी लागली आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा वरिष्ठ अधिकारी अहमद कुरायशी, हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा इमाद अल-अमिन या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. इराण आणि हिजबुल्लाहसाठी हा मोठा हादरा असल्याचा मानला जातो. त्याचबरोबर इस्रायली लष्कराने सोमवारी रात्री लेबेनॉनच्या सीमेजवळ फ्लेअर्स प्रक्षेपित केल्याच्या बातम्या आहेत. लेबेनॉनच्या सीमेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी इस्रायली लष्कराने ही कारवाई केल्याचे बोलले जाते.

इस्रायलची कोंडी

इस्रायलने सिरियात केलेल्या हवाई हल्ल्यांवर थेट इराणमधून प्रतिक्रिया आली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी इस्रायलला धमकावले. ‘लेबेनॉन अस्थिर करण्यासाठी इस्रायलने प्रयत्न केले. पण लेबेनॉन आणि हिजबुल्लाह इस्रायलविरोधात ठामपणे उभी आहे. जेव्हा कधी इस्रायल लष्करी हालचाल करील त्याआधीच हिजबुल्लाह इस्रायलची कोंडी करील, असा इशारा मेजर जनरल सलामी यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिरियन लष्कर तसेच इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील हल्ले वाढल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांचे कोठार लक्ष्य केले. तर चार दिवसांपूर्वी अमेरिकेने देखील येथील सिरियाच्या पूर्वेकडील इराणचे लष्कर व इराणसंलग्न दहशतवादी गटांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले होते. याशिवाय तुर्कीने उत्तर सिरियातील अस्साद समर्थक लष्कर व कुर्द संघटनेच्या ठिकाणांवर हवाई कारवाई केल्याच्या बातम्या आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info