रशियाच्या घणाघाती हल्ल्यांनंतर युक्रेनच्या लष्कराला सेव्हेरोडोनेत्स्क सोडण्याचे निर्देश

मॉस्को/किव्ह – रशियन फौजांकडून सुरू असणाऱ्या आक्रमक व घणाघाती हल्ल्यांमुळे कोंडीत सापडलेल्या युक्रेनी लष्कराला सेव्हेरोडोनेत्स्कमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.लुहान्स्कमधील युक्रेनी अधिकाऱ्यांनी याची कबुली दिली असून शहरातून युक्रेनी लष्कराची माघारी सुरू झाल्याचेही सांगितले. दुसऱ्या बाजूला सेव्हेरोडोनेत्स्कपासून जवळ असणाऱ्या लिशिचान्स्क शहरानजिकच्या मोक्याच्या भागांवर रशियाने ताबा मिळविला आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात युक्रेनी लष्कराला दुसरे शहरदेखील गमवावे लागेल, असे दावे करण्यात येत आहेत. रशियन हल्ल्यांमुळे माघारी घेण्यास भाग पडणाऱ्या युक्रेनला अमेरिकेने 45 कोटी डॉलर्सच्या नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. ही घोषणा होत असतानाच अमेरिकेने दिलेली ‘हायमार्स’ ही प्रगत संरक्षणयंत्रणा युक्रेनमध्ये दाखल झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्यापासून रशियाने युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील लष्करी मोहीम अधिक व्यापक व तीव्र केली होती. त्यासाठी नव्या लष्करी तुकड्या तसेच संरक्षणयंत्रणाही उतरविल्या होत्या. त्याला मोठे यश मिळाले असून गेल्या दीड महिन्यात रशियाने डोन्बासमधील मोठ्या भागावर ताबा मिळविला आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने डोन्बासमधील 55 टक्के भागावर रशियाने नियंत्रण मिळविल्याची कबुलीही दिली होती. यात लुहान्स्क व डोनेत्स्क या दोन्ही प्रांतांमधील मोठ्या तसेच महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.

सेव्हेरोडोनेत्स्क यापैकीच एक असून त्याच्या बहुतांश भागावर रशियन दलांनी ताबा मिळविल्याचे गेल्याच आठवड्यात समोर आले होते. मात्र शहराच्या सीमेवर असलेल्या ॲझोट सिमेंट फॅक्टरी परिसरातून युक्रेनच्या लष्कराने संघर्ष सुरू ठेवला होता. मात्र याही भागात रशियाने मोठे हल्ले केल्याने युक्रेनी लष्कराची कोंडी झाली आहे. सेव्हेरोडोनेत्स्कसह डोन्बासच्या इतर भागांमध्ये सुरू असलेल्या लढाईत युक्रेनी लष्कराला मोठी जीवितहानीही सहन करावी लागली. त्यामुळे त्यांच्यासमोर माघारीशिवाय कोणताही पर्याय राहिला नसून युक्रेनच्या प्रशासनाने आपल्या तुकड्यांना तसे अधिकृत आदेश दिल्याचे लुहान्स्क प्रांतातील अधिकारी सर्हिय हैदाई यांनी सांगितले. सेव्हेरोडोनेत्स्कपाठोपाठ लिशिचान्स्कवरील रशियन हल्लेही तीव्र झाले असून येत्या काही दिवसात युक्रेनला हे शहरदेखील गमवावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युक्रेनला लष्करी माघार घेणे भाग पडत असतानाच अमेरिकेने 45 कोटी डॉलर्सच्या नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. यात चार रॉकेट लाँचर सिस्टिम्सचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या वरिष्ठ नेत्यांनी अमेरिकेने दिलेले ‘हाय मार्स रॉकेट लाँचर्स’ देशात दाखल झाल्याची माहिती दिली होती. रशियन लष्कराची मोठी हानी घडविण्यासाठी जवळपास 300 रॉकेट लाँचर्सची मागणी युक्रेनने केली आहे. युक्रेनमध्ये रॉकेट लाँचर दाखल होत असतानाच रशियाचे ‘आयएल-76′ हे लष्करी मालवाहू विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन संरक्षणदलांनी दिली.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info