ब्रिस्बन – अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली आणि शत्रूच्या रडार यंत्रणांना गुंगारा देणारी अमेरिकेची ‘बी-2′ बॉम्बर विमाने ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियन वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी तसेच यापुढील युद्धसरावासाठी ही तैनाती असल्याचे अमेरिका व ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने ऑस्ट्रेलियात बॉम्बर्सची तैनाती केल्याचा दावा केला जातो. ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर, ‘बी-2′ बॉम्बर विमानांचे ऑस्ट्रेलियातील आगमन निराळेच संकेत देत आहेत.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या मिसौरी येथील हवाईतळावरुन चार ‘बी-2′ स्पिरीट बॉम्बर विमानांनी उड्डाण केले होते. यापैकी दोन बॉम्बर विमाने शनिवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाली. जवळपास 14 हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आलेली ही बॉम्बर विमाने ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बन येथील ॲम्बर्ली हवाईतळावर तैनात करण्यात आली आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या युद्धसरावाच्या पार्श्वभूमीवर या विमानांची तैनाती असल्याचे उभय देशांच्या हवाईदलाने स्पष्ट केले.
त्याचबरोबर अमेरिका ऑस्ट्रेलियन वैमानिकांना या बॉम्बर्सचे प्रशिक्षण देणार आहे. 2017 साली अमेरिका व ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘फोर्स पोश्चर ॲग्रीमेंट’नुसार हे हवाई सहकार्य पार पडल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार अमेरिकेचे बी-2 बॉम्बर्स स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे युद्धसरावासाठी म्हणून दाखल झालेले अमेरिकेचे बॉम्बर्स ऑस्ट्रेलियामध्ये दीर्घकाळासाठी तैनात राहू शकतात, असे संकेत मिळत आहेत.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने ऑस्ट्रेलियात बॉम्बर्स उतरविल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनने ऑस्ट्रेलियाची टेहळणी विमाने आणि विनाशिकेला आव्हान देण्याचे प्रकार केले आहेत. तर त्याआधी साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या लढाऊ विमानाने ऑस्ट्रेलियन टेहळणी विमानावर शॅफचा वापर केला होता. चीनच्या वाढत्या अरेरावीला उत्तर म्हणून अमेरिकेने ही बॉम्बर्सची तैनाती केल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सनी गुआम बेटांवरुन उड्डाण केले होते.
दरम्यान, या अण्वस्त्रवाहू स्टेल्थ बॉम्बर्सची तैनाती, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक योजनांचा भागअसल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्री मार्लेस यांनी अमेरिकेच्या सहकार्याने नवी संरक्षण आघाडी उघडत असल्याची घोषणा केली होती. पेंटॅगॉन येथे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची भेट घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री मार्लेस यांनी युक्रेनचा अनुभव घेऊन इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेशी तडजोड करणार नसल्याचे जाहीर केले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |