युक्रेनचे बाखमतसह डोन्बासमधील रशियन आघाडीवर मोठे हल्ले

- हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचा रशियाचा दावा

किव्ह/मॉस्को – युक्रेनी लष्कराने बाखमत शहरासह डोन्बास क्षेत्रातील रशियन आघाडीवर मोठे हल्ले चढविल्याचे वृत्त आहे. काही भागांमध्ये युक्रेनी लष्कराने रशियाच्या बचावफळीला खिंडार पाडल्याचे दावेही करण्यात आले आहेत. मात्र रशियाच्या संरक्षण विभागाने हे दावे फेटाळले असून बाखमत व सोलेदारसह डोनेत्स्कमधील युक्रेनच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले. बाखमतमधील रशियन मोहिमेत निर्णायक ठरलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’ने युक्रेनच्या दाव्यांना दुजोरा दिला असून ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’ सुरू झाल्याचेही बजावले.

रशियन आघाडीवर

गेल्या काही आठवड्यांपासून रशियन सैन्याने डोन्बास क्षेत्रातील हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढविली होती. या हल्ल्यांमुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागल्याचे सांगण्यात येते. सोलेदार शहरावरील ताबा व बाखमतच्या ९५ टक्के भागावर मिळविलेले नियंत्रण यामुळे रशियाच्या हल्ल्यांना यश मिळत असल्याचे दिसून आले होते. रशियाच्या या आघाडीला युक्रेन प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेद्वारे प्रत्युत्तर देईल, असे दावे माध्यमांमधून करण्यात येत होते. मात्र युक्रेन सरकारकडून प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेसाठी अजून वेळ लागणार असल्याची वक्तव्ये समोर आली होती.

रशियन आघाडीवर

या पार्श्वभूमीवर, गेल्या २४ तासांमध्ये युक्रेनकडून करण्यात आलेले दावे लक्ष वेधून घेणारे ठरतात. युक्रेनमधील सोशल मीडिया चॅनल्सनी रशियन आघाडीवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात सोलेदार, बाखमत व डोनेत्स्क भागात करण्यात आलेल्या हल्ल्यांचा उल्लेख आहे. यातील बाखमत शहरात झालेल्या हल्ल्यांना युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी दुजोरा दिला. गेल्या काही दिवसात युक्रेनी लष्कराने बाखमतमधील दोन किलोमीटर्सचा भाग ताब्यात घेतला असून रशियन तुकड्यांना माघारी लोटले आहे, असा दावा युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्री हॅना मॅलिअर यांनी केला.

रशियन आघाडीवर

बाखमतसंदर्भात करण्यात आलेल्या या वक्तव्याला रशियाची खाजगी लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’नेही दुजोरा दिला. ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी रशियन लष्कराने बाखमतमधील काही भाग गमावल्याचे सांगितले. रशियाच्या संरक्षण विभागाने हे दावे फेटाळले आहेत. उत्तर बाखमतमधील काही भागांमध्ये लष्करी तुकड्यांनी सामरिक उद्देशांनी फेररचना केली असून नव्या भागांमध्ये आघाडी घेतली असल्याचे संरक्षण विभागाने स्पष्ट केले. मात्र प्रिगोझिन यांनी या खुलाशावर टीकास्त्र सोडून याला माघार म्हणतात, असा टोला लगावला आहे.

बाखमतनजिक असलेल्या सोलेदार शहरासह डोनेत्स्क प्रांतातील काही भागांमध्ये युक्रेनी लष्कराने जवळपास ३० हल्ले केल्याचे रशियन सूत्रांकडून सांगण्यात आले. पण हे सर्व हल्ले परतविण्यात आले असून युक्रेनी लष्कराचे मोठे नुकसान घडविल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. युक्रेनी लष्कराला रशियन लष्कराची फळी तोडता आली नसल्याचेही रशियाने स्पष्ट केले. झॅपोरिझिआ तसेच खेर्सन प्रांतात युक्रेनने हल्ले चढविले नसल्याचेही रशियन संरक्षण विभागाने स्पष्ट केले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info