येत्या चार ते सहा महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट’मध्ये होईल

- नाटोच्या माजी कमांडरचा दावा

रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट'मध्ये

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – येत्या चार ते सहा महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर कोरियन वॉरप्रमाणे ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट’ मध्ये होईल, असा दावा नाटोचे माजी कमांडर ॲडमिरल जेम्स स्टाव्हरिडिस यांनी केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आखलेल्या योजना फारशा प्रभावी ठरलेल्या नाहीत व युक्रेनने चांगली टक्कर दिली आहे, असेही नाटोच्या माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नजिकच्या काळात युक्रेनबरोबर शांतीचर्चेचा मुद्दा उपस्थित झाल्यास त्यासाठीच्या अटी पूर्वीपेक्षा अधिक कठोर असतील, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी बजावले.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला साडेचार महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या काळात रशियाने युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्याचवेळी दक्षिण युक्रेनमधील दोन प्रांतांवर जवळपास 80 टक्क्यांहून अधिक ताबा मिळविला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युद्धाची नियोजित उद्दिष्टे पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे बजावले होते.

रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट'मध्ये

दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, पाश्चिमात्यांच्या शस्त्रपुरवठ्यामुळे युद्धातील समतोल बदलू लागल्याचा दावा केला आहे. अमेरिकेसह इतर देशांनी दिलेल्या शस्त्रांच्या बळावर युक्रेनी लष्कर रशियावर प्रतिहल्ले चढवून मोठे नुकसान घडविण्यात यशस्वी होत असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रि कुलेबा यांनी रशियाला रणांगणावर पराभूत केल्यावरच युक्रेन रशियाशी चर्चा करील, असे बजावले.

रशिया व युक्रेनकडून ही वक्तव्ये येत असतानाच पाश्चिमात्य देशांमधून मात्र वेगळा सूर व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यात पाश्चिमात्य मुत्सद्दी तसेच विश्लेषक युक्रेनने शांतीचर्चेसाठी तयारी सुरू करावी, असे सल्ले वारंवार देत आहेत. पाश्चिमात्य देशांमधील काही प्रमुख देशांच्या नेत्यांनीही युक्रेनला सावधगिरीचे इशारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाटोच्या माजी अधिकाऱ्यांनी ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट’चा केलेला उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरतो.

रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर ‘फ्रोजन कॉन्फ्लिक्ट'मध्ये

एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत, नाटोचे माजी कमांडर स्टाव्हरिडिस यांनी, रशिया व युक्रेन या दोन्ही देशांमध्ये चार ते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ संघर्ष करण्याची क्षमता नसल्याचा दावा केला. ‘या युद्धाचा शेवट कोरियन युद्धाप्रमाणे होईल. शस्त्रसंधी, निर्लष्करी क्षेत्र व कायमस्वरुपी शत्रुत्वाच्या रुपात हा एक गोठविलेला संघर्ष ठरेल’, असे स्टाव्हरिडिस म्हणाले. 1950 ते 1953 या कालावधीत उत्तर व दक्षिण कोरियात युद्ध झाले होते. यात शस्त्रसंधी झाली असली तरी शांतीकरार झालेला नाही. त्यामुळे दोन्ही देश परस्परांविरोधात युद्धस्थितीत असल्याचे मानले जाते.

दरम्यान, रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात प्रथमच ‘कामिकाझे’ अर्थात आत्मघाती ड्रोन्सचा वापर केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआ प्रांतात ‘लॅन्सेट’ या आत्मघाती ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले केल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info