मॉस्को/किव्ह – युक्रेनने खेर्सनमधील रशियन तळांवर चढविलेल्या प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनी दक्षिण युक्रेनमधील ओडेसा व मायकोलेव्हमध्ये मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविले. या दोन प्रांतांमध्ये 10 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. मायकोलेव्ह भागात ‘एस-300′ यंत्रणेतील क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. दक्षिण युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रहल्ले सुरू असतानाच डोनेत्स्क भागातील शहरांमध्ये रशियाने तीव्र हवाईहल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून युक्रेनने दक्षिण भागातील खेर्सन प्रांतांवर प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. रशियाचे काही लष्करी तळ, कमांड पोस्टस्, इंधनाचे डेपो तसेच महत्त्वाचे ब्रिज लक्ष्य करण्यात युक्रेनला यश मिळाले होते. खेर्सनमधील काही गावे रशियाला गमवावी लागल्याचे दावेही युक्रेनने केले होते. याच यशाच्या बळावर पुढील दोन महिन्यात खेर्सन प्रांत रशियाच्या ताबब्यातून मुक्त करु, असा इशारा युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र युक्रेनचे हे इरादे उधळण्यासाठी रशिया अधिक आक्रमक झाला असून मंगळवारचे क्षेपणास्त्रहल्ले त्याचाच भाग मानला जातो.
मंगळवारी रशियाच्या लढाऊ विमानांनी ओडेसा बंदरानजिक असलेल्या काही गावांना लक्ष्य केले. या भागात चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येते. गेल्या चार दिवसात ओडेसावर झालेला हा दुसरा क्षेपणास्त्र हल्ला आहे. तर मायकोलेव्ह प्रांतात आठ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. या भागातील शस्त्रसाठ्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनची मोठी हानी झाल्याचे समोर आले आहे.
रशियाने डोनेत्स्क भागातही मोठे हवाईहल्ले चढविले आहेत. बाखमत व स्लोव्हिआन्स्क या दोन शहरांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. बाखमतनजिकच्या भागात रशियाने आघाडी मिळविल्याचा दावाही करण्यात आला आहे.
युक्रेनमध्ये राजवट बदलण्यासाठी रशिया सहाय्य करेल – परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह
कैरो – रशियन व युक्रेनची जनता पुढील काळात एकत्र राहू शकते. सध्या युक्रेनमध्ये असलेल्या लोकविरोधी राजवटीत बदल घडविण्यासाठी आम्ही सहाय्य करु, असा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून इजिप्तमध्ये झालेल्या अरब लीगच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी रशियाने युक्रेमध्ये राजवट बदलण्याचे इरादे नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे लॅव्हरोव्ह यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |