झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावरील युक्रेनचे हल्ले हा आण्विक दहशतवाद

- रशियाच्या संरक्षणमंत्र्यांचा आरोप

आण्विक दहशतवाद

मॉस्को/किव्ह – गेल्या सहा आठवड्यात युक्रेनने झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर तब्बल २९ हल्ले चढविले आहेत. हा आण्विक दहशतवाद असून त्याला अमेरिका व युरोपिय महासंघ चिथावणी देत आहे, असा घणाघाती आरोप रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केला. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या पथकाचा मानवी ढालीप्रमाणे वापर करून अणुप्रकल्पावर नियंत्रण मिळविण्याची युक्रेनची योजना असल्याचा ठपका रशियाच्या संरक्षण विभागाने ठेवला आहे. गुरुवारी आयोगाचे पथक अणुप्रकल्पाच्या पाहणीसाठी दाखल झाले होते. प्राथमिक पाहणीनंतर या पथकाचा भाग असलेले काही निरीक्षक प्रकल्पात कायमस्वरुपी तैनात करण्यात येतील, अशी माहिती रशियन माध्यमांनी दिली आहे.

आण्विक दहशतवाद

युक्रेनच्या झॅपोरिझिआ प्रकल्पावर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारीआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक प्रकल्पाच्या पाहणीसाठी दाखल झाले. या पथकाची भेट सकारात्मक घटना असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली असून प्रकल्पाबाबत असणारे सर्व गैरसमज दूत होतील, असा विश्वासही व्यक्त केला. पथकाकडून पाहणीची प्रक्रिया सुरू असतानाच रशिया व युक्रेनदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाल्याचे समोर आले. युक्रेनने रशियाच्या लष्करी तैनातीचा उल्लेख करून आयोगाने तात्काळ प्रकल्प ‘डिमिलिटराईज’ करण्याची शिफारस करावी, अशी आग्रही मागणी केली.

युक्रेनने केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी थेट आण्विक दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ‘पाश्चिमात्यांनी दिलेली शस्त्रे वापरून युक्रेन अणुप्रकल्पावर हल्ले करीत आहे. या हल्ल्यांमुळे अणुप्रकल्पाला खऱ्या अर्थाने धोका निर्माण झाला आहे. युक्रेनच्या हल्ल्यांमुळे युरोपात कधीही भयावह आण्विक दुर्घटना घडू शकते’, असे रशियन संरक्षणमंत्र्यांनी बजावले. गेल्या दीड महिन्यात युक्रेनने अणुप्रकल्पावर १२० आर्टिलरी शेल्सचा मारा केला असून १६ आत्मघाती ड्रोन्सही प्रकल्पाजवळ धाडली होती, असे शोईगू यांनी सांगितले.

आण्विक दहशतवाद

संरक्षणमंत्री शोईगू यांनी ठेवलेल्या ठपक्यानंतर रशियाच्या संरक्षण विभागानेही युक्रेनवर हल्ल्यांचे आरोप केले. ‘युक्रेनच्या लष्कराने प्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार, आयोगातील निरीक्षकांना मानवी ढाल म्हणून ओलिस धरण्यात येणार आहे. आयोगाने पाठविलेल्या पथकाच्या माध्यमातून अणुप्रकल्पावर नियंत्रण मिळविण्याचे युक्रेनचे इरादे आहेत’, असे रशियन संरक्षण विभागाने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. अणुऊर्जा आयोगाचे पथक अणुप्रकल्पात दाखल झाल्यानंतर त्यांना युक्रेनने केलेल्या हल्ल्यांचे पुरावेही दाखविण्यात आल्याचा दावा रशियाने केला.

दरम्यान, अणुऊर्जा आयोगाच्या पथकाची प्राथमिक पाहणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. अणुऊर्जा आयोगासह पथकाचे प्रमुख असलेले रफाएल ग्रॉसी माघारी परतले आहेत. पण पथकाचा भाग असलेले काही निरीक्षक कायमस्वरुपी प्रकल्पात तैनात होणार असल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info