पाश्चिमात्य देश शेवटचा युक्रेनियन असेपर्यंत रशियाशी संघर्ष करतील

- रशियाचे वरिष्ठ अधिकारी सर्जेई किरिएन्को यांचा दावा

पाश्चिमात्य

मॉस्को/किव्ह/लंडन – युक्रेनच्या नेतृत्त्वाने नाटोच्या रशियाविरोधी संघर्षासाठी आपल्याच जनतेला विकले आहे, असा घणाघाती आरोप रशियाचे वरिष्ठ अधिकारी सर्जेई किरिएन्को यांनी केला. आपले हितसंबंध जपण्यासाठी युक्रेनियन्स जीव देत असल्याचे पाहून पाश्चिमात्य देशांना आनंद होत असून शेवटचा युक्रेनियन जिवंत असेपर्यंत ते रशियाविरोधातील संघर्ष सुरु ठेवतील, असा दावाही किरिएन्को यांनी केला. दरम्यान, रशियाच्या क्रिमिआतील संरक्षणतळावर झालेल्या हल्ल्यात किमान सात रशियन लढाऊ विमाने नष्ट झाल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले असून त्यातून रशियाचे दावे खोटे ठरत असल्याचा ठपका युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी ठेवला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख म्हणून सर्जेई किरिएन्को कार्यरत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान, रशिया-युक्रेन संघर्षावर आपली भूमिका मांडली. ‘रशिया युक्रेनमध्ये युक्रेनी लष्कर व जनतेविरोधात लढत नाही, याची पूर्ण जाणीव रशियाला आहे. युक्रेनचा वापर करून नाटो रशियाविरोधात संघर्ष करीत आहे. पाश्चिमात्य देशांच्या रशियाविरोधातील संघर्षासाठी युक्रेनच्या नेतृत्त्वाने आपल्या देशाचा व जनतेचा बळी दिला. युक्रेनमधील अखेरची व्यक्ती जिवंत असेपर्यंत नाटो रशियाशी संघर्ष करीत राहिल. हे सांगण्यात नाटोला जराही वावगे वाटत नाही. नाटोला युक्रेनी लोकांचे बळी जात असल्याची चिंता वाटण्याची शक्यता नाही’, असा आरोप किरिएन्को यांनी केला.

पाश्चिमात्य

रशियन अधिकाऱ्यांनी केलेल्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर क्रिमिआ प्रांतात झालेल्या हल्ल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी क्रिमिआतील साकी या संरक्षणतळावर अनेक स्फोट होऊन मोठी आग लागल्याचे समोर आले होते. रशियन अधिकाऱ्यांनी सदर दुर्घटना अंतर्गत अपघातातून झाल्याचे दावे केले होते. मात्र अमेरिकी कंपनीने तळावरील हल्ल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. त्यात तळावर तैनात असलेल्या लढाऊ विमानांसह काही इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पाश्चिमात्य अधिकाऱ्यांनी रशियाची किमान सात लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा केला. तर युक्रेनने नऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याचे म्हटले आहे. मात्र हल्ला नक्की कसा झाला, याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी, लष्कराच्या ‘स्पेशल ऑपरेशन्स कमांड’ने हल्ला चढविल्याचा दावा केला आहे. काही पाश्चिमात्य माध्यमांनी युक्रेनने दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा किंवा हवाईहल्ल्याचा वापर केला असावा, असे दावे केले आहेत.

पाश्चिमात्य

क्रिमिआवरील हल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा क्रिमिआवरील ताब्याचा मुद्दा उपस्थित केला. युक्रेनने क्रिमिआवर ताबा मिळविल्याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध संपणार नाही, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला. क्रिमिआ हा युक्रेनचा भाग आहे आणि आम्ही त्यावरील हक्क कधीही सोडणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी बजावले. दरम्यान, अमेरिकेने जाहीर केलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याच्या घोषणेनंतर ब्रिटन व डेन्मार्क या देशांनीही नवे शस्त्रसहाय्य जाहीर केले. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी युक्रेनला नव्या ‘मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम्स’ पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. तर डेन्मार्कने ११ कोटी युरोंचे संरक्षणसहाय्य देण्यात येत असल्याची माहिती दिली. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी अवघी ३० टक्के शस्त्रे युक्रेनच्या संरक्षणदलांपर्यंत पोहोचत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

रशियन फौजांनी गेल्या २४ तासात पूर्व युक्रेनमधील दोन शहरांमध्ये प्रवेश करण्यात यश मिळविल्याचे संरक्षणविभागाकडून सांगण्यात आले. यात बाखमत व सोलेदारचा समावेश आहे. त्याचवेळी पिस्की व मरिन्का शहरातील बहुतांश भाग आपल्या ताब्यात आल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला. तर खेर्सन प्रांतातील बेरिस्लाव भागात युक्रेनी फौजांनी हवाईहल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info