लंडन – रशिया-युक्रेन युद्ध, विक्रमी महागाई व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई या पार्श्वभूमीवर अस्थैर्याची स्थिती निर्माण होत असून जगभरात असंतोषाचा भडका उडण्याचा धोका अधिकच वाढला आहे, असा इशारा ब्रिटीश अभ्यासगटाने दिला. आफ्रिका व आशियातील अविकसित देशांसह युरोप खंडातील प्रगत देशांमध्येही इंधनाचे वाढते दर व ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ मुळे नागरी असंतोषाचा वणवा भडकू शकतो, असे ‘व्हेरिस्क मॅपलक्रॉफ्ट’च्या नव्या अहवालात बजावले आहे. यापूर्वीही संयुक्त राष्ट्रसंघटना व निगडित गटांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भडकलेल्या महागाई तसेच अन्नटंचाईचा उल्लेख करून आशिया व आफ्रिका खंडात अराजकसदृश स्थिती निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधले होते.
‘101 कींज् विटनेस राईज इन सिव्हिल अनरेस्ट लास्ट क्वार्टर’ या नावाचा अहवाल ब्रिटीश अभ्यासगटाने प्रसिद्ध केला आहे. त्यात गेल्या काही महिन्यात जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये अस्थिरता व असंतोष वाढल्याचे नमूद करण्यात आले. त्याचवेळी जगातील विविध देशांमध्ये सामाजिक व आर्थिक दडपण वाढविणाऱ्या घटना घडत असून येणाऱ्या काळात असंतोषाची स्थिती अधिक तीव्र झालेली दिसेल, असे ब्रिटीश अभ्यासगटाने बजावले. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर असंतोषाची व्याप्ती अधिकच वाढल्याकडे ‘व्हेरिस्क मॅपलक्रॉफ्ट’ने लक्ष वेधले.
2022 सालात दुसऱ्या ते तिसऱ्या तिमाहिच्या काळात जगभरातील 198 देशांपैकी 101 देशांमध्ये असंतोषाचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यात आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकी देशांपासून युरोपिय देशांचाही समावेश आहे, असे ब्रिटीश अभ्यासगटाने स्पष्ट केले. महागाईचा भडका व ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ जगण्यासाठी करावा लागणारा आवश्यक खर्च वाढत चालल्यामुळे जनतेतील नाराजी वाढत असून लवकरच मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलने सुरू झालेली दिसतील, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. अहवालात श्रीलंकेसह केनिया, इक्वेडोर, पेरु, इराण या देशांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
युरोपातील स्वित्झर्लंड, नेदरलॅण्डस्, जर्मनी यासारख्या देशांमधील जनतेतूनही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य व इंधनाचे दर आकाशाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे प्रगत देशांमधील जनतेलाही ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागत असून येणाऱ्या काळात या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची स्थिती पहायला मिळेल, असे ब्रिटीश अभ्यासगटाने बजावले आहे.
गेल्या वर्षभरात युरोपातील इंधन व वीजेच्या दरांमध्ये तब्बल 450 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. अनेक आघाडीच्या देशांनी आपल्या नागरिकांना तसेच उद्योगक्षेत्रालाही वीजटंचाईला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |