क्रेमलिनवरील हल्ल्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा रशियाचा आरोप

- हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना लक्ष्य करण्यासाठी युक्रेनने क्रेमलिनवर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. अमेरिकेची सहमती व सहाय्याखेरीज युक्रेन हा हल्ला चढवू शकत नाही, असे रशियाचे म्हणणे आहे. एससीओच्या बैठकीसाठी भारताच्या दौऱ्यावर असलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी तसा आरोप केला आहे. तसेच रशिया या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी दिला आहे. तर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी रशियाचा अमेरिकेशी थेट संघर्ष होण्याची शक्यता अधिकच बळावल्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेचा हात

बुधवारी रशियाच्या क्रेमलिनवर ड्रोन हल्ला झाला होता आणि हा हल्ला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना संपविण्यासाठी युक्रेनने केल्याचे आरोप रशियाने केले होते. तसेच या हल्ल्यांना जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची धमकी रशियाने दिली होती. पण आता रशियाने या हल्ल्यामागे अमेरिकेचे कारस्थान असल्याचे दावे केले आहेत. गोवा येथील एससीओच्या बैठकीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेच्या सहमती व सहकार्याखेरीज युक्रेन असा हल्ला चढवू शकत नाही, युक्रेनकडे ती क्षमताच नसल्याचा दावा केला. अमेरिकेचे उघडपणे नाव घेतलेले नसले तरी लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या या हल्ल्यामागे अमेरिकाच असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच या हल्ल्याला रशिया प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे सांगून लॅव्हरोव्ह यांनी तणाव अधिकच वाढविला आहे.

अमेरिकेचा हात

याबरोबरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या तालावर नाचणारे बाहुले असल्याची टीका लॅव्हरोव्ह यांनी केली. युक्रेन व युक्रेनचे पाश्चिमात्य मालक खोटारडेपणात अतिशय पारंगत असल्याचा टोलाही लॅव्हरोव्ह यांनी लगावला. तर रशियाचे उपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी बुधवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका व रशियाचा थेट संघर्ष भडकण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. रशिया व अमेरिकेचे संबंध पूर्णपणे कोलमडण्याच्या बेतात आहेत, तसे होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे रिब्कोव्ह पुढे म्हणाले. मात्र अमेरिकेच्या कारवायांमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारणे अवघड बनल्याचे संकेत रिब्कोव्ह यांनी दिले आहेत.

अमेरिकेने मात्र रशियाचे हे सारे आरोप धुडकावले आहेत. बुधवारी क्रेमलिनवर झालेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा संबंध नाही. तिथे नक्की काय झाले ते आम्हाला ठाऊक नाही. पण यासाठी अमेरिकेला जबाबदार धरणे मुर्खपणाचे ठरेल, असा दावा अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे सदस्य जॉन किर्बी यांनी केला आहे.

युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासूनच हे युद्ध पाश्चिमात्य विरुद्ध रशिया असे असल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. शिवाय युक्रेनवर हल्ला चढवून आपण हे युद्ध सुरू केलेले नाही, हे रशिया जगाला दाखवू पाहत आहे, असा ठपका किर्बी यांनी ठेवला. दरम्यान, रशियाने युक्रेनवर अधिक तीव्रतेचे हल्ले चढविण्याची तयारी केली असून क्रेमलिनवरील हल्ल्यानंतर रशियाला यासाठी आवश्यक ते कारण मिळाल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक व माध्यमे करीत आहेत. तसेच क्रेमलिनवरील हल्लाचा युक्रेनने रशियन शहरांवर नवे ड्रोन हल्ले चढवून रशियाला चिथावणी दिल्याचे दिसत आहे. यामुळे रशिया युक्रेनच्या विरोधात जबरदस्त लष्करी आघाडी उघडणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचवेळी युक्रेनने देखील रशियावर प्रतिहल्ल्याची तयारी केल्याचे दावे केले जातात. त्यामुळे रशिया युक्रेन तसेच अमेरिकेवर करीत असलेले आरोप व त्याला युक्रेन तसेच अमेरिकेकडून दिले जाणारे प्रत्युत्तर म्हणजे पुढच्या काळातील अधिकच घनघोर युद्धाची घोषणा असल्याचे स्पष्ट होत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info