रशियाने इंधनपुरवठा रोखल्यानंतर युरोपिय शेअरबाजार कोसळले

- युरो दोन दशकांमधील नीचांकी पातळीवर

शेअरबाजार कोसळले

मॉस्को/ब्रुसेल्स – तांत्रिक दोष दूर झाले नसल्याने ‘नॉर्ड स्ट्रीम 1’ इंधनवाहिनीतून होणारा इंधनवायूचा पुरवठा अनिश्चित काळाकरता बंद ठेवण्याची घोषणा रशियाने केली आहे. रशियाच्या या घोषणेचे तीव्र पडसाद युरोपिय देशांमध्ये उमटले. युरोपमधील इंधनवायूच्या दरांमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचवेळी युरोपातील आघाडीचे शेअरबाजार कोसळले असून युरोझोनचे चलन असलेल्या युरोचे मूल्यही दोन दशकांमधील नीचांकी पातळीवर घसरले. इंधनाची टंचाई, वाढलेले दर आणि शेअरबाजार व चलनात झालेली घसरण यामुळे युरोपला मंदीचा फटका बसण्याचा धोका वाढल्याचा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

शेअरबाजार कोसळले

गेल्या महिन्यात रशियाची आघाडीची कंपनी ‘गाझप्रोम’ने 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. मात्र शनिवारी इंधनवाहिनीत दोष आढळल्याचे सांगून इंधनपुरवठा अनिश्चित काळाकरता बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती रशियाकडून देण्यात आली. रशियाच्या या घोषणेनंतर युरोपातील अनेक देशांनी इंधनक्षेत्रासाठी अतिरिक्त अर्थसहाय्यासह इतर मदतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. मात्र त्यानंतरही युरोपियन शेअरबाजार व चलन बाजारपेठेत तीव्र पडसाद उमटले.

सोमवारी युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या फ्रान्स व जर्मनीमधील शेअरनिर्देशांकात घसरण झाली. त्यानंतर युरोपातील मध्यवर्ती शेअर निर्देशांक असणाऱ्या ‘युरो स्टॉक्स 50’ व ‘युरोपिअन स्टॉक्स 600’ या दोन्ही निर्देशांकही खाली आले. ‘युरोपिअन स्टॉक्स 600’मध्ये एक टक्क्याची तर ‘युरो स्टॉक्स 50’मध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ सोमवारी झालेल्या व्यवहारांमध्ये युरोचे मूल्य एक टक्क्याने घसरून 0.9880 डॉलर्सपर्यंत खाली आले. ही 2002 सालानंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. इंधनवायूचे दरही कडाडले असून सोमवारी नैसर्गिक इंधनवायूच्या दरांमध्ये 30 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

शेअरबाजार कोसळले

रशियन इंधनपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहण्याचे ठोस परिणाम अजून समोर येण्यास सुरुवात झालेली नाही. पण इंधन नसल्यास युरोपच्या विकासाला खीळ बसू शकते. त्याचा परिणाम म्हणून युरोच्या मूल्यात अधिक घसरण होईल, असा दावा ऑस्ेलियन विश्लेषक रॉड्रिगो कॅलि यांनी दिला. इंधनाच्या दरांचा भडका, इंधनपुरवठ्यातील टंचाईचा धोका व पतधोरणातील बदल यांचा फटका युरोपच्या विकासदराला बसू शकतो, असे जर्मन अर्थतज्ज्ञ होल्गर श्मिडिंग यांनी बजावले.

दरम्यान, चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या घसरणीमुळे युरोपातील प्रमुख अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनी, फ्रान्स व इटलीसारख्या देशांच्या निर्यातीला धक्का बसला आहे. गेले काही महिने युरोपच्या उत्पादन क्षेत्रातही घसरण होत असून या क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारी 2021नंतरच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ऊर्जा संकटाची वाढती व्याप्ती, महागाईचा भडका, उत्पादन व निर्यातीला बसलेला फटका आणि आता शेअरबाजारांसह युरो चलनात झालेली घसरण हे घटक युरोपिय महासंघाची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचा धोका वाढल्याचे संकेत देत आहेत, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, विक्रमी महागाई व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई या पार्श्वभूमीवर अस्थैर्याची स्थिती निर्माण होत असून जगभरात असंतोषाचा भडका उडण्याचा धोका अधिकच वाढला आहे, असा इशारा ब्रिटीश अभ्यासगटाने नुकताच दिला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info