मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिलेल्या खरमरीत इशाऱ्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनवर जबरदस्त व घणाघाती हल्ले केले आहेत. युक्रेनमधील खार्किव्ह, खेर्सन व डोनेत्स्क प्रांतासह इतर प्रांतातील जवळपास ३० शहरांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे, हवाईहल्ले, रॉकेट्स तसेच तोफांचा वापर करण्यात आला. खेर्सन प्रांतात झालेल्या लढाईत रशियन फौजांनी युक्रेनच्या १००हून अधिक जवानांना ठार केल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने नजिकच्या काळात रशियन फौजा युक्रेनमधील नव्या भागांसह पायाभूत सुविधा व प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करतील, असा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यात युक्रेनच्या फौजांनी ईशान्य युक्रेनमधील रशियन लष्करावर प्रतिहल्ले चढवून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. रशियन लष्कराची ही पिछेहाट रशियासह आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. खार्किव्ह प्रांतात रशियन लष्कराने घेतलेल्या माघारीसह युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी युक्रेनला गंभीर परिणाम घडविणाऱ्या हल्ल्यांचा इशारा दिला होता. ‘रशियन फौजांवर अधिक दडपण आणण्याचा प्रयत्न झाला तर रशिया पुढील काळात अधिक आक्रमक व जबर हल्ले करेल’, असे पुतिन यांनी बजावले होते. पुतिन यांच्या या इशाऱ्यानंतर रशियन फौजांनी आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविल्याचे समोर आले आहे.
शनिवारी रशियन फौजांनी पूर्व, दक्षिण, ईशान्य तसेच मध्य युक्रेनमधील विविध प्रांत व शहरांना लक्ष्य केले. यात ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह, पूर्व युक्रेनमधील सिव्हेर्स्क व मरिन्का, दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआ, खेर्सन व मायकोलेव्ह तर मध्य युक्रेनमधील क्रिव्हयि रिह या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. रशियन फौजांनी २४ तासांच्या अवधीत जवळपास ३० शहरांवर हल्ले केल्याचे समोर आले. या हल्ल्यांसाठी क्रूझ तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, तोफा, रॉकेट्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली.
खेर्सनमध्ये झालेल्या लढाईत रशियन फौजांनी प्रावडिनो भागातील युक्रेनच्या हल्ल्याला जबर प्रत्युत्तर देऊन तो उधळल्याचा दावा केला. या कारवाईत युक्रेनचे १२०हून अधिक जवान ठार झाल्याचे तसेच युक्रेनची ड्रोन्स, रणगाडे नष्ट केल्याची माहिती रशियाने दिली आहे. याव्यतिरिक्त डोनेत्स्कमधील लढाईत २००हून अधिक युक्रेनी जवान ठार झाल्याचे रशियन प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, नजिकच्या काळात रशियाचे हल्ले अधिक प्रखर होतील, असा इशारा ब्रिटनच्या संरक्षण विभागाने दिला. खार्किव्हमधील माघारीनंतर रशियन फौजा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे शब्द प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करीत असून युक्रेनमधील हल्ल्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. वीज केंद्र, धरण यासारख्या जागांवर झालेले हल्ले रशिया युक्रेनमधील पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करु शकतो, याचे संकेत देतात असे ब्रिटनच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |