रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची युक्रेनच्या चार प्रांतांना रशियाचा भाग बनविणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी

मॉस्को – रशियाने ताबा मिळविलेल्या युक्रेनचा चार प्रांतांना देशाचा हिस्सा बनविणाऱ्या कायद्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वाक्षरी केली. यामुळे रशियन लष्कराच्या ताब्यात असलेले लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ हे युक्रेनचे चार प्रांत आता कायदेशीररित्या रशियाचा भाग बनले आहेत. नव्या कायद्यानुसार, या प्रांतांमध्ये 2023 सालापासून रशियन चलन रुबलचा वापर सुरू होणार असून 2026 सालापर्यंत सदर प्रांत रशियाशी पूर्णपणे जोडले जाणार आहेत. पुतिन यांनी या प्रांतांमध्ये हंगामी प्रशासकीय प्रमुखांच्या नियुक्तीचीही घोषणा केली. रशियन राष्ट्राध्यक्षांकडून कायद्यावर स्वाक्षरी होत असतानाच खेर्सन प्रांतातील जवळपास 20 ‘सेटलमेंट्स’ युक्रेनी लष्कराने ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

कायद्यावर स्वाक्षरी

गेल्या महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये सार्वमत घेतले होते. त्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्याच आठवड्यात रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ हे प्रांत रशियाचा भाग बनल्याची घोषणा केली होती. या प्रांतातील रशियासमर्थक प्रशासनाबरोबर करारही करण्यात आले होते. या करारांना रशियन संसद तसेच घटना न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले असून त्यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. रशियाचा भाग बनलेल्या प्रांतांसाठी रशिया कुठल्याही टोकाचा निर्णय घेईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यापूर्वीच बजावले होते.

कायद्यावर स्वाक्षरी

दरम्यान, रशियाने विलिनीकरण केलेल्या प्रांतांवर युक्रेनी लष्कराकडून मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ले सुरू आहेत. डोनेत्स्क तसेच खेर्सन प्रांतांमध्ये या प्रतिहल्ल्यांना चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे. डोनेत्स्क प्रांतातील लिमन या महत्त्वाच्या शहरावर ताबा मिळविल्यानंतर खेर्सनमधील काही शहरे तसेच गावे ताब्यात घेतल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. युक्रेनने दिलेल्या माहितीला रशियाकडूनही दुजोरा मिळाला आहे. रशियन माध्यमे, विश्लेषक तसेच संरक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांमध्ये खेर्सनमधील संघर्ष तसेच माघारीचा उल्लेख आहे.

कायद्यावर स्वाक्षरी

युक्रेनला मिळत असलेल्या या यशामागे अमेरिका व युरोपिय देशांकडून मिळणारे संरक्षणसहाय्य हा प्रमुख घटक ठरला आहे. मंगळवारी अमेरिकेने युक्रेनसाठी 65 कोटी डॉलर्सच्या नव्या संरक्षणसहकार्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला पुरविलेल्या शस्त्रसहाय्याचे मूल्य 16 अब्ज डॉलर्सच्या वर गेले आहे. यात हवाईसुरक्षा यंत्रणेसह, हायमार्स रॉकेट्स तसेच जॅवलिन क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. हे सहाय्य पुरवित असतानाच अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांबाबत नवा इशारा दिला.

‘पुतिन यांचे निर्णय चुकीच्या गृहितकांवर आधारलेले आहेत. युक्रेनसह अमेरिका व पाश्चिमात्य देशांविरोधात आपण कठोर धोरण राबवू शकतो, असे त्यांना वाटते. पण त्याचवेळी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय धोकादायक ठरु शकतात’, असा इशारा सीआयएच्या प्रमुखांनी दिला.

मराठी     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info