किव्ह/मॉस्को – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, रशियावरील हल्ल्यांबाबत दिलेली नवी धमकी म्हणजे नव्या महायुद्धाची चिथावणी असून त्याचे विनाशकारी परिणाम होतील, असा इशारा रशियाने दिला आहे. नाटोने रशियावर ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स’ चढवावेत व रशियाची अणुहल्ला करण्याची योजना उधळावी, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली होती. रशियाने अणुहल्ले चढवेपर्यंत युक्रेन वाट पाहू शकत नाही, असेही झेलेन्स्की यांनी बजावले. नाटोसमोर हल्ल्यांची मागणी करीत असतानाच युक्रेनच्या लष्कराने खेर्सन प्रांतातील तब्बल 500 चौरस किलोमीटर्सचा भाग ताब्यात घेतल्याचा दावाही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खार्किव्हसह दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनी लष्कराला मोठे यश मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर युक्रेनची राजवट अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच रशियाशी चर्चेचे मार्ग बंद केल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर रशियन सैन्याच्या माघारीचे तसेच युक्रेनच्या हल्ल्यांचे फोटोग्राफ्स सातत्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानंतर आता नाटोकडे रशियावर हल्ले चढविण्याची मागणी करून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी टोकाची भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासगटासमोर केलेल्या वक्तव्यात झेलेन्स्की यांनी, रशियाने पुढे पाऊल टाकण्याआधीच नाटोने हल्ले करावेत अशी मागणी केली. ‘रशियाने चढविलेले भीषण हल्ले आंतरराष्ट्रीय समुदायाने पाहिले आहेत. आता पुढील काळात रशियाला अणुहल्ल्यांपासून रोखायचे असेल तर नाटोने आधीच त्यांच्यावर हल्ले करायला हवेत. रशिया अणुहल्ले करु शकणार नाही, अशी स्थिती निर्माण करायला हवी. त्यामुळे रशियाला कळेल की अणुहल्ल्याचे परिणाम काय होऊ शकतात’, अशा शब्दात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला धमकावले आहे. रशिया युक्रेनवर अणुहल्ले करेपर्यंत वाट पाहता येणार नाही, त्याने युद्धाची तीव्रता अधिकच वाढेल असेही झेलेन्स्की यांनी बजावले.
झेलेन्स्की यांच्या या वक्तव्यावर रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे महायुद्धाची चिथावणी आहे व त्याचे अत्यंत विनाशकारी परिणाम होऊ शकतात, असा इशारा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. तर झेलेन्स्की यांची विधाने युक्रेनच्या राजवटीकडून असलेल्या धोक्याला दुजोरा देणारी असून रशियाने लष्करी मोहीम का राबविली याचे उत्तर यातून मिळेल, असा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला.
दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने दक्षिणेच्या खेर्सन प्रांतातील तब्बल 500 चौरस किलोमीटर्सचा भाग ताब्यात घेतल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. अवघ्या सात दिवसात युक्रेन लष्कराने ही कामगिरी करून दाखविल्याचेही त्यांनी सांगितले. झेलेन्स्की हा दावा करीत असतानाच रशियाने किव्ह प्रांतासह झॅपोरिझिआमध्ये ड्रोनहल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. यात रशियाने इराणी ड्रोन्सचा वापर केल्याचेही सांगण्यात आले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |