युक्रेनच्या युद्धात रशियाची नाटोबरोबरील टक्कर म्हणजे वैश्विक आपत्ती ठरेल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

अस्ताना – यापुढे रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा व भीषण हवाई हल्ले चढविणार नाही, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी केली. मात्र युक्रेनच्या युद्धात रशियाची नाटोशी टक्कर झाली तर मात्र ती ‘वैश्विक आपत्ती’ ठरेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला आहे. गुरुवारी जी-7 देशांनी रशियाकडून देण्यात येत असलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर, त्याचे गंभीर परिणाम संभवतात, असे बजावले होते. त्यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची ही प्रतिक्रिया आली आहे.

युक्रेनच्या युद्धात

अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व जपान या जी-7 देशांच्या बैठकीत युक्रेनच्या युद्धावर चर्चा पार पडली. युक्रेनपासून रशियाने तोडलेले चार प्रांत आता रशियन संघराज्याचा भाग बनले आहेत, असे सांगून रशियाने त्यांच्या संरक्षणासाठी अणुहल्ला चढविताना कचरणार नाही, असे बजावले होते. त्यावर जी-7च्या या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. रशियाने युक्रेनच्या युद्धात अणुहल्ला चढविलाच, तर त्याचे भयंकर परिणाम संभवतात, याची जाणीव जी-7ने रशियाला करून दिली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिलेली अणुहल्ल्याची धमकी दुर्लक्षित करता येण्याजोगी नसल्याचे बजावले आहे.

मात्र अणुहल्ला चढवून ‘न्यूक्लिअर आर्मागेडॉन’ अर्थात ‘आण्विक विनाश’ टाळण्याचा मार्ग रशियासमोर शिल्लक नसेल, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. त्यांचे हे उद्गार पाश्चिमात्य माध्यमांनी उचलून धरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, कझाकस्तानच्या अस्ताना मध्ये पार पडलेल्या परिषदेदरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या युद्धाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात मांडली. रशियाला क्रिमिआशी जोडणाऱ्या पुलावर युक्रेनने स्फोट घडवून आणल्याचा आरोप करून रशियाने युक्रेनच्या शहरांवर शंभराहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. पण पुढच्या काळात रशिया युक्रेनवर असे हल्ले चढविणार नाही, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली.

युक्रेनच्या युद्धात

युक्रेन नष्ट करणे हे काही आमचे ध्येय नाही. त्यामुळे पुढच्या काळात युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा तसेच हवाई हल्ले चढविले जाणार नाहीत, सध्या तरी रशियाचा तसा विचार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले. त्याचवेळी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा आपल्याला अजिबात पश्चाताप होत नसल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या या निर्णयाचे समर्थन केले. भारत व चीन हे देश रशियाचे सहकारी असून त्यांनी युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. पण युक्रेनच्या सरकारने वाटाघाटी करणार नाही, असा निर्णय जाहीर केलेला आहे, याकडे लक्ष वेधून वाटाघाटीची शक्यता युक्रेननेच उधळून लावले आहेत, याची जाणीव रशियन राष्ट्राध्यक्षांनी करून दिली.

जर्मनीसारख्या देशाने युक्रेनच्या युद्धात नाटोच्या बाजूने उभे राहून जर्मन जनतेच्या हितापेक्षा नाटोला अधिक महत्त्व दिल्याची टीका रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली. या निर्णयाची किंमत जर्मन उद्योगक्षेत्र व जनतेला चुकती करावी लागत आहे, असा टोला पुतिन यांनी लगावला. काही दिवस आधीच रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपण युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले होते. मात्र हा पुरवठा स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय युरोपिय देशांनी घ्यायचा आहे, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढे म्हणाले होते. हिवाळा तोंडावर आलेला असताना, रशियन इंधनवायुची कमतरता युरोपिय देशांना भासेल आणि या काळात रशिया युरोपच्या विरोधात इंधनाचा हत्यारासारखा वापर करील, असे इशारे दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, रशिया युरोपिय देशांना इंधन पुरविण्यास तयार असल्याचे जाहीर करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या देशावर होणाऱ्या या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र इंधनाची प्रचंड मागणी असूनही युक्रेनच्या युद्धामुळे युरोपिय देशांना रशियाकडून आलेला हा प्रस्ताव स्वीकारणे अवघड बनल्याचे दिसत आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info