क्रिमिआवरील ताब्याच्या मुद्यावर रशिया अणुयुद्ध छेडू शकते

- अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को – ‘रशियाने क्रिमिआ प्रांतावरील ताबा गमावणे म्हणजे अमेरिकेने हवाई बेट व पर्ल हार्बर गमावण्यासारखे आहे. क्रिमिआ हा रशियाचा अविभाज्य भाग झाला आहे. क्रिमिआवरील अधिकार सोडणे किंवा अण्वस्त्रांचा वापर करणे असे दोन पर्याय रशियासमोर आले तर ते दुसऱ्या पर्यायाचा वापर करतील. पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकून त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आता रशियाकडे गमावण्यासारखे काही राहिलेले नाही’, या शब्दात अमेरिकेचे आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी क्रिमिआवरील ताब्याच्या मुद्यावर रशिया अणुयुद्ध छेडू शकते असा इशारा दिला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अणुहल्ल्याच्या मुद्यावर बोलताना ही पोकळ धमकी नसल्याचे बजावले होते. त्यानंतर अणुयुद्धाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिका व नाटोने रशियाला अणुहल्ल्यांवरून गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. तर फ्रान्सने अणुहल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली आहे. युक्रेनला ‘सॅटेलाईट इंटरनेट’ सेवा पुरविणाऱ्या मस्क यांनी, युक्रेनच्या नेतृत्वाने रशियाबरोबरील शांतीचर्चेसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर युक्रेनमधून तीव्र टीका झाली होती.

असे असतानाही मस्क यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन संघर्षाबाबत आपले मत व्यक्त करून लक्ष वेधून घेतले आहे. रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेची घोषणा करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, युक्रेनी लष्कर क्रिमिआ ताब्यात घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा दिला होता. रशियाच्या क्रिमिआतील तळावर तसेच रशियाला जोडणाऱ्या कर्च ब्रिजवर हल्ले चढविण्यात आले होते. त्यानंतर रशियाने युक्रेनी शहरांना क्षेपणास्त्रांनी भाजून काढत परिणामांची जाणीव करून दिली होती. मस्क यांनी क्रिमिआसाठी रशिया अणुहल्ल्यांचा पर्यायही स्वीकारु शकतो, असे सांगून युक्रेनला सावधगिरीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील वीज व पाणीपुरवठा यंत्रणांना लक्ष्य करण्याची मोहीम कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यापासून रशिया युक्रेनची राजधानी किव्हसह देशातील प्रमुख शहरांमधील वीजकेंद्रे व पाणीपुरवठा केंद्रांवर मारा करीत आहे. आतापर्यंत रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील एक तृतियांश वीजपुरवठा यंत्रणा नष्ट झाली आहे. त्यानंतरही रशियाचे हल्ले सुरुच असून गेल्या 24 तासांमध्ये राजधानी किव्हसह ओडेसा, डिनिप्रो, झायटोमिर या भागांमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. त्याचवेळी डोनेत्स्क व खेर्सनमध्येही जोरदार संघर्ष सुरू असल्याची कबुली युक्रेनी यंत्रणांकडून देण्यात आली.

युक्रेन सीमेनजिक असणाऱ्या रशियाच्या येय्स्क शहरात एका इमारतीवर ‘एसयु-34’ हे लढाऊ विमान आदळून झालेल्या दुर्घटनेत किमान 13 जणांचा बळी गेल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली आहे.

रशिया व युक्रेनमध्ये कैद्यांची देवाणघेवाण

मॉस्को – सोमवारी रशिया व युक्रेनमध्ये 200 हून अधिक कैद्यांची देवाणघेवाण झाली. गेल्या 10 दिवसात झालेली ही दुसरी देवाणघेवाण ठरते. युक्रेनने रशियाच्या 110 कैद्यांची मुक्तता केली असून त्यात खलाशी तसेच महिलांचा समावेश आहे. रशियाने युक्रेनच्या 108 महिला जवानांची सुटका केल्याची माहिती दिली.

गेल्या आठवड्यात रशिया व युक्रेनने परस्परांच्या प्रत्येकी 20 जवानांची मुक्तता केली होती. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा मोठ्या प्रमाणात कैद्यांची देवाणघेवाण झाल्याने ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या कैद्यांमध्ये युक्रेनने फेब्रुवारी महिन्यात ताब्यात घेतलेल्या 70हून अधिक रशियन खलाशांचा समावेश आहे. तर रशियाने मुक्त केलेल्या कैद्यांमध्ये युक्रेनच्या लष्करातील महिला जवान सामील असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांनी परस्परांच्या 100हून अधिक जवानांची मुक्तता केली होती. रशिया व युक्रेनमधील युद्धकैद्यांच्या मुक्ततेसाठी तुर्की तसेच सौदी अरेबिया यासारख्या देशांनी मध्यस्थी केल्याचे उघड झाले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info