किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हसह मध्य व पश्चिम युक्रेनी शहरांमध्ये क्षेपणास्त्र व ड्रोन्सच्या जबरदस्त हल्ल्याचे सत्र रशियाने सुरू केले आहे. यामुळे शनिवारी सकाळीच युक्रेनच्या या शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. क्षेपणास्त्र व ड्रोन्सच्या हल्ल्यांद्वारे रशिया युक्रेनमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्याचवेळी रशिया मात्र युक्रेनचे लष्कर खेर्सन प्रांतातील खाकोवास्काया येथील जलविद्युत प्रकल्पावर हल्ले चढवून आपल्याला चिथावणी देत असल्याचे रशियाने म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे भयंकर परिस्थिती उद्भवू शकते, याची जाणीव युक्रेनला करून द्या, अशी मागणी रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे. त्यामुळे मध्य व पश्चिम युक्रेनमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करून रशिया युक्रेनला खाकोवास्काया येथील जलविद्युत प्रकल्पावरील हल्ल्याची किंमत मोजण्यास भाग पाडत असल्याचे संकेत मिळत आहेत.
युक्रेनी लष्कराने मध्य व पश्चिमेकडील प्रांतावर रशियाने क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सचा मारा सुरू केल्याचा ठपका ठेवला. रशियाने जमीनवरून तसेच सागरी क्षेत्रातूनही या युक्रेनच्या प्रांतांवर सुमारे ३३ क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. यापैकी १८ क्षेपणास्त्रे हवेतच भेदण्यात आपल्याला यश मिळाल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. तर या प्रांतांमधील युक्रेनी जनता वीजपुरवठा खंडित झाल्याने हवालदिल बनली आहे. याबरोबर सातत्याने होणारे क्षेपणास्त्र, ड्रोन्स व रॉकेटचे हल्ले इथल्या जनतेला भयभीत करीत आहेत. यामुळे युक्रेनच्या युद्धाची व्याप्ती अधिकाधिक वाढत चालली असून आत्तापर्यंत रशियाच्या हल्ल्यांपासून तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित राहिलेल्या युक्रेनच्या प्रांतांनाही या युद्धाची तीव्रता जाणवू लागली आहे.
रशियाने युक्रेनच्या मुलभूत सुविधा पुरविणाऱ्या प्रकल्पांना लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेनकडून होत आहे. याचा दाखला देऊन युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे हवाई सुरक्षा यंत्रणांची तसेच इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे. आपल्या या मागण्या पूर्ण होत नसल्याची तक्रार देखील युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करीत आहेत. त्याचवेळी रशियाने मात्र युक्रेनच खेर्सन प्रांतातील खाकोवास्काया जलविद्युत प्रकल्पावर हल्ले चढवीत असल्याचा आरोप केला. युक्रेनचे हे हल्ले ‘एचआयएमएआरएस’या अमेरिकन बनावटीच्या रॉकेट लाँचरद्वारे केले जात असल्याचेही रशियाने बजावले आहे. ही बाब रशियाला चिथावणी देणारी असून याचे गंभीर परिणाम संभवतात, ते टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने युक्रेनला या हल्ल्यांपासून परावृत्त करावे, असे रशियाने बजावले आहे. रशियन माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
रशियाने युक्रेनपासून तोडून आपल्या संघराज्याला जोडलेल्या चार प्रांतांमध्ये खेर्सनचा समावेश आहे. या चार प्रांतांवरील हल्ले म्हणजे रशियाच्या भूभागावरील हल्ले मानले जातील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला होता. तसेच आपल्या भूभागाच्या संरक्षणासाठी रशिया अणुहल्ला चढवतानाही कचरणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन वारंवार बजावत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनचे लष्कर अमेरिकेने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून खेर्सनमधील या जलविद्युत प्रकल्पाला लक्ष्य करीत आहे, ही प्रक्षोभक बाब ठरते, याची जाणीव रशियाने करून दिलेली आहे. मध्य व पश्चिम युक्र्रेनमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांना लक्ष्य करून रशियाने युक्रेनला याच्या परिणामांचे इशारे दिल्याचे दिसते. पुढच्या काळातही युक्रेनचे असे हल्ले सुरू राहिले, तर त्याचे याहूनही भीषण परिणाम सहन करावे लागतील, असे स्पष्ट संकेत रशियाकडून दिले जात आहेत.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |