युक्रेन डर्टी बॉम्बचा वापर करून रशियाला जबाबदार ठरविल

- रशियाच्या संरक्षणमंत्र्यांचा गंभीर आरोप

डर्टी बॉम्बचा वापर

मॉस्को/किव्ह  – युक्रेनची राजवट रशिया-युक्रेन संघर्षाला मोठी चिथावणी देण्यासाठी ‘डर्टी बॉम्ब’चा वापर करु शकतो, असा खळबळजनक आरोप रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केला आहे. रशियावर सर्वसंहारक शस्त्रांचा वापर केल्याचा ठपका ठेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रमक मोहीम छेडणे हा त्यामागील उद्देश असल्याचेही शोईगू यांनी बजावले. शोईगू यांच्या वक्तव्याला रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह तसेच परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दुजोरा दिला आहे. मात्र युक्रेनसह अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने रशियाचे आरोप फेटाळून लावले असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर दिले.

डर्टी बॉम्बचा वापर

रशियाकडून युक्रेनवर जोरदार क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला डोन्बास तसेच खेर्सन प्रांतात रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे. खेर्सन प्रांतात रशियाने नव्या लष्करी तैनातीला सुरुवात केली असून युक्रेनचे हल्ले रोखण्यात यश मिळाल्याचा दावा केला. रशियाविरोधात मोठे यश मिळत नसल्याने युक्रेनकडून रशियाविरोधात आरोपांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच खेर्सन प्रांतातील नोवा काखोव्हा धरण व जलविद्युत प्रकल्प उडवून देण्यासाठी रशियाने सुरुंग पेरल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. त्यानंतर हा प्रकल्प उडवून देणे हणजे अणुबॉम्ब टाकण्याइतकीच भयावह घटना ठरेल, असा इशाराही दिला.

डर्टी बॉम्बचा वापर

रशिया युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार असल्याची वक्तव्येही युक्रेनच्या राजवटीकडून सातत्याने करण्यात येत आहेत. पण रशियाने हे दावे फेटाळले असून अण्वस्त्रांचा वापर करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. उलट युक्रेनच ‘डर्टी बॉम्ब’चा वापर करु शकतो, असा आरोप रशियाकडून करण्यात आला. युक्रेनमध्ये ‘न्यूक्लिअर इन्सिडंट’ घडल्यास सर्व जग रशियाच्या विरोधात जाईल, असे आडाखे बांधून ‘डर्टी बॉम्ब’च्या वापराचा कट आखण्यात आल्याचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी बजावले. शोईगू यांनी आपली ही चिंता अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व तुर्की या देशांच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या संभाषणातही व्यक्त केल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

युक्रेनची राजवट ‘लो यिल्ड न्यूक्लिअर डिव्हाईस’चा वापर करण्याची योजना आखत असल्याचे पुरावे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाला मिळाले आहेत, असे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांनी स्पष्ट केले. रशियाच्या परराष्ट्र विभागानेही संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यांना दुजोरा दिला. युक्रेनकडून होणाऱ्या ‘डर्टी बॉम्ब’च्या वापराचा मुद्दा रशिया संयुक्त राष्ट्रसंघटनेसह इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करील, असे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाचे हे आरोप अमेरिकेसह ब्रिटन व फ्रान्सने फेटाळले आहेत. रशियाच्या वक्तव्यांमध्ये तथ्य नसल्याची प्रतिक्रिया या देशांनी दिली. रशियाने अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे रशियाची अशा हल्ल्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे असा होतो, असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

दरम्यान, रविवारी रशियाने मायकोलेव्ह भागात क्षेपणास्त्र तसेच ड्रोनच्या सहाय्याने हल्ले चढविल्याचे समोर आले आहे. मायकोलेव्ह प्रांत खेर्सन प्रांताला जोडलेला आहे. खेर्सनमध्ये युक्रेनी फौजा रशियावर हल्ले चढवित असताना रशियाकडून मायकोलेव्ह तसेच ओडेसावर करण्यात येणारे हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info